२५ वर्षाच्या न्यायालयीन लढ्याला यला यश ; लाडशाखीय वाणी समाजाची इमारत परत मिळाल्याने समाजात आनंदाचे वातावरण
जनसंघर्ष न्यूज
धुळे : श्री लाडशाखीय वाणी समाज संस्था, धुळे यांच्या मालकीची गट नं. ४ येथील सिटी सर्व्हे नं. १३१९ ही इमारत तब्बल २५ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर पुन्हा संस्थेच्या ताब्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संस्थेच्या विश्वस्तांनी पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत मालमत्तेचा ताबा घेतल्याची माहिती श्री लाडशाखीय वाणी समाज संस्थेचे अध्यक्ष राजाराम वाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान ही मिळकत विक्री करून मोहाडीत संस्थेच्या साडेपाच एकर जमिनीवर मंगल कार्यालय आणि वाणी समाजबांधवांसाठी वसतीगृह निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रोडवरील सभागृहात आयोजित पत्र परिषदेत बोलतांना संस्थेचे अध्यक्ष राजाराम वाणी यांनी सांगितले की, १९७२ पासून ही तीन मजली इमारत संस्थेच्या मालकीची आहे. सन २००१ मध्ये तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता ही मालमत्ता अरुण सोनीराम शिनकर व सौ. सविता अरुण शिनकर यांना देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या व्यवहाराविरोधात समाजातील अनेक सदस्यांनी आक्षेप घेतला होता. अशोक पाटकर यांच्या पुढाकाराने समाजबांधवांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. सहधर्मादाय आयुक्तांनी ३० ऑक्टोबर २००७ रोजी विक्री परवानगीचा अर्ज फेटाळून लावत मालमत्तेचा ताबा संस्थेकडे देण्याचे आदेश दिले. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालय व सवों च्च न्यायालयात गेले. अखेरीस उच्च न्यायालयाने ४ मे २०२६ रोजी याचिका नामंजूर करून सहधर्मादाय आयुक्तांचा आदेश कायम ठेवला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही शिनकर दाम्पत्याची एसएलपी फेटाळली. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संस्थेने कायदेशीररित्या मालमत्तेचा ताबा घेतला. यावेळी अध्यक्ष राजाराम वाणी, उपाध्यक्ष वसंत देव, सचिव प्रा.डी.व्ही. कोठावदे, कार्याध्यक्ष अशोक पाटकर, खजिनदार जगदीश खैरनार यांच्यासह विश्वस्त व समाजबांधव उपस्थित होते. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी आणि विश्वस्तांचे समाजातून कौतूक करण्यात येत असून समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

