निकुंभे गावात ग्रामस्थाची हत्या; आरोपी कुटुंबाला हद्दपार करण्याची गावकऱ्यांची मागणी

0

निकुंभे गावात ग्रामस्थाची हत्या; आरोपी कुटुंबाला हद्दपार करण्याची गावकऱ्यांची मागणी

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - जिल्ह्यातील निकुंभे येथे शानाभाऊ शंभू पाटील या ग्रामस्थाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ८ जून रोजी शानाभाऊ पाटील यांच्यावर गावातीलच दशरथ किसन ठाकरे याने पाठीमागून लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पाटील यांचा दुसऱ्या दिवशी, ९ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ निकुंभे गावातील संतप्त ग्रामस्थांनी आज धुळ्याचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून प्रशासनाला निवेदन दिले आहे.

आरोपी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी गावात दहशत माजवली असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. शेतातील साहित्याच्या चोऱ्या करणे, दमदाटी करणे आणि खोटे आरोप करून त्रास देणे, असे प्रकार या कुटुंबाकडून होत असल्याच्या तक्रारी निवेदनात नमूद आहेत. या गुन्हेगारीला कंटाळून, मुख्य आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कायमस्वरूपी जिल्ह्यातून हद्दपार करावे, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे. योग्य कारवाई न झाल्यास गावातील शांतता धोक्यात येऊ शकते, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)