ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांची मार्गदर्शक सूचना
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांची मार्गदर्शक सूचना
मिरवणुकीत शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन; डीजे, शस्त्रे व आक्षेपार्ह घोषणांना बंदी
धुळे, दि. 18 ऑगस्ट : ईद-ए-मिलाद 2026 सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच सण उत्साहात आणि शांततेत पार पडावा, यासाठी धुळे पोलिसांनी विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ईद-ए-मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) यंदा 26 ऑगस्ट 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे.
धुळे येथील मंथन हॉल, पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा तसेच मुस्लिम बांधव पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मिरवणूक व धार्मिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक सूचना देण्यात आल्या.
ईद-ए-मिलादच्या दिवशी मिरवणूक, कुराण वाचन, धार्मिक प्रवचन, तकरीर, दावत-ए-आम आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सोमवार, 24 ऑगस्ट रोजी रात्री 11.55 वाजेपासून बुधवार, 26 ऑगस्ट रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू राहणार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार, मिरवणुकीसाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून निर्धारित मार्गात कोणताही बदल करता येणार नाही. मिरवणुकीदरम्यान सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होईल अशी भाषणे, आक्षेपार्ह घोषणा, हावभाव किंवा धार्मिक भावना दुखावणारे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही, याचीही आयोजकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिरवणुकीत झेंडे फिरवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाईप, लाकडी दांडे किंवा बांबूची लांबी चार फुटांपेक्षा अधिक नसावी, अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच मोठ्या आवाजात सायलेंसरसह मोटारसायकल चालविणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे तसेच मोटारसायकलवर ट्रिपल सीट प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
मिरवणुकीत डीजे वापरण्यास पूर्णपणे बंदी असून संगीत, गायन, ढोल, वाद्ये, शिंगे आणि ध्वनिवर्धकांचा वापर नियमांनुसार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इतर धर्मस्थळांजवळ किंवा धार्मिक स्थळांसमोर मोठ्या आवाजात संगीत, गाणी, ढोल-ताशे अथवा कोणत्याही प्रकारचा गोंगाट करण्यास मनाई आहे.
मिरवणुकीत सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दगड किंवा शस्त्रे सोडण्यासाठी अथवा फेकण्यासाठी वापरली जाणारी साधने बाळगण्यासही प्रतिबंध आहे.
पोलिसांनी मुस्लिम समाजातील विविध पंथांमध्ये आपापसात वाद निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर दलित, हिंदू किंवा मुस्लिम समाजाबाबत धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश, चित्रे किंवा चित्रफिती प्रसारित करू नयेत. आक्षेपार्ह पोस्ट टाकणे किंवा धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
गोवंश तस्करी अथवा गोहत्या करू नये, अन्यथा प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. तसेच दहशतवादी किंवा अतिरेकी संघटनांशी संबंधित कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिरवणुकीच्या मार्गावर CCTV कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार असून, व्हिडिओग्राफरच्या माध्यमातून संपूर्ण मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास किंवा आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान यापूर्वी देण्यात आलेल्या आक्षेपार्ह घोषणा पुन्हा देऊ नयेत, तसेच कोणत्याही धर्माविरोधात आक्षेपार्ह पोस्ट किंवा घोषणा करू नयेत. धार्मिक स्थळांचा वापर बेकायदेशीर कामांसाठी होणार नाही, याचीही संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
धुळे जिल्ह्यात ईद-ए-मिलादचा सण शांतता, बंधुभाव आणि उत्साहात पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन धुळे पोलिस प्रशासनाने केले आहे.
लेबल: महाराष्ट्र पोलीस, सण


0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ