बुधवार, २३ सप्टेंबर, २०२६

बनावट दारू बनवण्याचा डाव फसला! आझादनगर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १२५० लिटर स्पिरिट जप्त!

 

बनावट दारू बनवण्याचा डाव फसला ! आझादनगर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १२५० लिटर स्पिरिट जप्त!

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- बनावट दारू तयार करण्यासाठी तब्बल १२५० लिटर स्पिरिटची वाहतूक करणाऱ्या दोघांना आझादनगर पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या कारवाईत स्पिरिटसह दोन चारचाकी वाहने असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी आझादनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, धुळे शहरातील पांझरा नदीलगत वड भिलाटी रोडवरील एका पत्री शेडमध्ये बनावट दारू तयार करण्यासाठी स्पिरिटची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकत विनोद बन्सीलाल फुलपगारे, वय ४७ वर्षे, रा. भोई गल्ली, जुने धुळे आणि जितेंद्र सेवाराम टेकवाणी, वय ४७ वर्षे, रा. कुमारनगर, साक्री रोड, धुळे या दोघांना ताब्यात घेतले.

या कारवाईत ५ ड्रममध्ये १०७५ लिटर स्पिरिट, तसेच ५ कॅनमध्ये १७५ लिटर स्पिरिट, असा एकूण १२५० लिटर बनावट दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे स्पिरिट जप्त करण्यात आले.

यासोबतच मारुती सुझुकी वॅगनआर आणि महिंद्रा पिकअप अशी दोन वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ७५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७६/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई), १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विनोद पाटील आणि पोलीस अंमलदारांनी केली.

बनावट दारू निर्मितीला आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास आझादनगर पोलीस करीत आहेत.

लेबल: ,

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ