सोमवार, १४ सप्टेंबर, २०२६

२४ वर्षांची परंपरा कायम! भगवा चौक गणेश मंडळाच्या गणरायाचे जल्लोषात स्वागत

 


२४ वर्षांची परंपरा कायम! भगवा चौक गणेश मंडळाच्या गणरायाचे जल्लोषात स्वागत

ढोल-ताशांचा गजर | १२ पावलीचा ठेका | फटाक्यांची आतषबाजी

जनसंघर्ष न्यूज 

    धुळे : शहरातील गणेशोत्सवाची परंपरा आणि उत्साहाची झलक दाखविणाऱ्या भगवा चौक गणेश मंडळाच्या गणरायाचे यंदा मोठ्या जल्लोषात वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, गणेशभक्तांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या १२ पावली नृत्यामुळे भगवा चौक परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला.

     भगवा चौक गणेश मंडळाच्या गणरायाच्या आगमनानिमित्त महाराणा प्रताप पुतळा येथून भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या तालावर आणि गणरायाच्या जयघोषात मिरवणूक मार्गस्थ झाली. कार्यकर्त्यांनी पारंपरिक १२ पावली नृत्यावर ठेका धरत गणरायाच्या आगमनाचा आनंद साजरा केला.

     मिरवणूक भगवा चौक येथे पोहोचल्यानंतर गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गणरायाच्या दर्शनासाठी आणि स्वागतासाठी परिसरातील नागरिक व गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

२४ वर्षांची परंपरा

    भगवा चौक गणेश मंडळाचे यंदाचे २४ वे वर्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणरायाचे भव्य स्वागत, विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम तसेच समाजप्रबोधनपर देखावे हे मंडळाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते.

    दरवर्षी केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक प्रश्नांकडे नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे भगवा चौक गणेश मंडळाच्या देखाव्यांकडे शहरवासीयांचे विशेष लक्ष असते.

यंदाही ज्वलंत विषयावर समाजप्रबोधनपर देखावा

     मंडळाची समाजप्रबोधनपर देखावा सादर करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. यावर्षी एका ज्वलंत आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयावर देखावा सादर करण्यात येणार आहे. या माध्यमातून समाजातील वास्तव परिस्थिती नागरिकांसमोर मांडत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

      गणरायाच्या आगमनाने भगवा चौक परिसरात गणेशोत्सवाची उत्सवी सुरुवात झाली असून, आगामी दिवसांत मंडळाच्या विविध उपक्रमांना सुरुवात होणार आहे. भक्ती, संस्कृती आणि समाजप्रबोधनाचा संगम साधत यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प आयोजक एडवोकेट पंकज गोरे यांनी केला आहे.

    यावेळी एडवोकेट गुलाब गोरे, माजी नगरसेवक नंदकुमार गोरे, प्रवीण मुर्तडकर, विनोद रनमळे, आप्पा लहामगे, विजय गोरे,मनोज गवळी, मंगेश पिंगळे, बिल्लू शर्मा, बाळू पेढवाल, राजेंद्र ठक्कर, बाळू पाटील, गुलाब येलमामे, योगेश गोरे,भटू नवाळे, देविदास पाटील, पंकज भारस्कर, सागर साळवे, जयवंत गोरे,धनंजय दीक्षित, ज्ञानेश्वर देवरे, श्याम गुप्ता, निलेश चौधरी, सौरभ जवराल, गोकुळ येलमामे, स्वप्नील सोनवणे,सिद्धेश गोरे, साई गोरे, अंकुश बोबडे, मयूर कुळकर्णी, ऋषिकेश गोरे, सिद्धार्थ गोरे, रोहित गिरासे, हर्षल ढोले, अजय वराडे, रोहित लहामगे, पंकज बागुल, अमोल गोरे, कुणाल मराठे,विनोद प्रजापत, विक्की गर्ग, यांच्या सह भागातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते

लेबल: ,

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ