धुळ्यात महिला दहीहंडी उत्सवात फुटणार ‘अवैध धंद्यांची दहीहंडी’; एडवोकेट पंकज गोरे यांच्या पुढाकाराने अनोखा उपक्रम

धुळ्यात महिला दहीहंडी उत्सवात फुटणार ‘अवैध धंद्यांची दहीहंडी ’; एडवोकेट पंकज गोरे यांच्या पुढाकाराने अनोखा उपक्रम
५ सप्टेंबर रोजी भगवा चौकात महिला दहीहंडी उत्सवाचे आयोजन ; विद्यार्थी, महिला आणि धुळेकर नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
जनसंघर्ष न्यूज
धुळे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एडवोकेट पंकज गोरे यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही महिला दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भगवा चौक येथे हा उत्सव उत्साहात पार पडणार आहे. मात्र यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे पारंपरिक दहीहंडीबरोबरच ‘अवैध धंद्यांची दहीहंडी’ फोडून सामाजिक संदेश देण्यात येणार आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात वाढत असलेल्या कथित अवैध धंद्यांना आळा घालावा, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि तरुण पिढीला व्यसन व गुन्हेगारीपासून दूर ठेवावे, या मागणीसाठी एडवोकेट पंकज गोरे यांच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, आता दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातूनही अवैध धंद्यांविरोधात जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भगवा चौकातील महिला दहीहंडी उत्सवाला गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवात पाहायला मिळतो. यंदा या परंपरेला सामाजिक विषयाची जोड देत अवैध धंद्यांविरोधातील संदेश दहीहंडीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव केवळ मनोरंजनाचा न राहता सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधणारा ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
एडवोकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात धुळे शहरातील अवैध धंदे बंद करण्यासह प्रशासनाने या प्रकारांकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी करण्यात येत आहे. विशेषतः तरुणाईला व्यसनाधीनतेपासून वाचविणे, शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करणे आणि अवैध व्यवसायांना आळा घालणे, या मुद्द्यांवर आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर ‘अवैध धंद्यांची दहीहंडी फोडूया’ या संकल्पनेतून यंदाचा दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. दहीहंडी फोडण्याच्या माध्यमातून प्रशासन आणि समाजाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, युवक तसेच धुळे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एडवोकेट पंकज गोरे व भगवा चौक गणेश सार्वजनिक गणेश अध्यक्ष पंकज भारस्कर यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे ५ सप्टेंबर रोजी भगवा चौकात होणाऱ्या या महिला दहीहंडी उत्सवाकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, उत्सवाच्या माध्यमातून दिला जाणारा सामाजिक संदेश आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन याकडे कोणत्या पद्धतीने पाहते, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. पारंपरिक उत्सवाला सामाजिक आंदोलनाची जोड देत यंदा धुळ्यातील महिला दहीहंडी उत्सव वेगळ्या कारणासाठी चर्चेत येणार आहे.


0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ