अंगणवाडी क्रमांक १२ मागील भागात संरक्षण भिंत व वॉल कंपाऊंडची मागणी ; ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
अंगणवाडी क्रमांक १२ मागील भागात संरक्षण भिंत व वॉल कंपाऊंडची मागणी ; ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
जनसंघर्ष न्यूज
शहादा, प्रतिनिधी :
शहादा तालुक्यातील मौजे प्रकाशा येथील श्यामनगर भागातील अंगणवाडी केंद्र क्रमांक १२ च्या मागील बाजूस संरक्षण भिंत तसेच वॉल कंपाऊंड तातडीने उभारण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत श्यामनगर भागातील ग्रामस्थांनी शहादा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, अंगणवाडीच्या मागील भागात सध्या संरक्षण भिंत नसल्याने परिसरात विषारी सर्प तसेच इतर सरपटणारे प्राणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. अंगणवाडीच्या जवळच जिल्हा परिषद मराठी शाळा असल्याने तेथे येणाऱ्या लहान बालकांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत, अंगणवाडी परिसरात संरक्षण भिंत व वॉल कंपाऊंडचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
या निवेदनावर गोपालभाऊ बिल, महेश गुरव, दीपक ठाकरे, चेतन ठाकरे, अविनाश शिरसाट आणि पंकज कोळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
“लहान बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून प्रशासनाने कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने संरक्षण भिंत उभारावी,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लेबल: जनसंघर्ष न्यूज, समस्या



0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ