पालकमंत्र्यांसमोर कुटुंबाचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न; आंदोलनात्मक अटक, मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सावकारांवर कारवाईसाठी गोंदूरच कुटुंब आक्रमक.....
पालकमंत्र्यांसमोर कुटुंबाचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न; आंदोलनात्मक अटक, मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.
वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सावकारांवर कारवाईसाठी गोंदूरच कुटुंब आक्रमक.
जनसंघर्ष न्युज
धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान शनिवारी (दि. १५ ऑगस्ट २०२६) एका कुटुंबाने सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत मोठा अनर्थ टाळला. त्यानंतर मंगलबाई रामदास पाटील, राजेंद्र रामदास पाटील, भाग्यश्री राजेंद्र पाटील आणि दिव्या राजेंद्र पाटील या चौघांना आंदोलनात्मक अटक करून धुळे शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
या कुटुंबाने यापूर्वी पालकमंत्री तसेच वरिष्ठ पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली होती. तक्रारीमध्ये आठ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, शेतीच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक, मानसिक छळ, धमक्या आणि सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे त्यांच्या पती स्वर्गीय रामदास पाटील यांनी ७ जुलै २०२६ रोजी आत्महत्या केल्याचा आरोप मंगलाबाई रामदास पाटील यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींनी शेतीचे व्यवहार प्रलंबित ठेवून आर्थिक व मानसिक त्रास दिला, वारंवार धमकावले आणि त्यामुळेच कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या तक्रारीच्या प्रती उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याला पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मागण्या मान्य होत नसल्याने संतप्त झालेल्या कुटुंबाने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पालकमंत्र्यांसमोर सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यांना ताब्यात घेतले आणि आंदोलनात्मक अटक करून धुळे शहर पोलीस ठाण्यात हलविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
"न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र होणार"
पोलीस ठाण्यातूनही कुटुंबीयांनी आपली भूमिका कायम ठेवत, संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून न्याय द्यावा, अशी मागणी पुन्हा केली. तसेच येत्या काही दिवसांतही मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोप हे तक्रारदार कुटुंबाने केलेले असून संबंधित व्यक्तींची बाजू अद्याप समोर आलेली नाही. प्रकरणाची अधिकृत चौकशी आणि पोलीस तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.


0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ