शुक्रवार, ३ जुलै, २०२६

​धुळ्यात 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' नाटकावरून वाद; बॅनर्सची तोडफोड, प्रयोगावर बंदी घालण्याची मागणी

धुळ्यात 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' नाटकावरून वाद; बॅनर्सची तोडफोड, प्रयोगावर बंदी घालण्याची मागणी

जनसंघर्ष न्यूज 

​        धुळे - शहरात रविवारी, ५ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' या नाटकाला स्थानिक पुरोगामी संघटनांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. भारतीय संविधान सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात लावलेले या नाटकाचे बॅनर्स फाडून आपला निषेध नोंदवला. या नाटकाच्या माध्यमातून ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड केली जात असून, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. हेडगेवार यांच्या विचारधारेची चुकीची सांगड घालून बहुजन समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे. तसेच, संवेदनक्षम महापुरुषांच्या पुतळ्याजवळ असे बॅनर्स लावून जाणीवपूर्वक सामाजिक भावना दुखावल्या जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

​      या संपूर्ण प्रकरणाबाबत भारतीय संविधान सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना रीतसर निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात नाटकाचे आयोजक, लेखक व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी सदर नाटकाच्या प्रयोगावर प्रशासनाने तत्काळ बंदी घालावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास हिरे भवन येथे जाऊन नाटक उधळून लावू आणि रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही आंदोलकांनी निवेदनातून दिला आहे. यामुळे धुळे शहरात या नाटकावरून प्रशासनासमोर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

लेबल: , , ,

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ