सोमवार, २७ जुलै, २०२६

दिल्लीतील यशानंतर धुळ्यात विद्यार्थ्यांची भव्य 'विजय तिरंगा रॅली'; राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी.

 

दिल्लीतील यशानंतर धुळ्यात विद्यार्थ्यांची भव्य 'विजय तिरंगा रॅली ' ; राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी.

जनसंघर्ष न्यूज 

​धुळे: नवी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या ऐतिहासिक यशानंतर त्याचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी धुळे शहरात 'तिरंगा संघर्ष समिती'च्या वतीने एका भव्य 'विजय तिरंगा रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेली ही रॅली शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरून मार्गस्थ झाली. या लक्षवेधी रॅलीमध्ये तब्बल ६०० मीटर लांबीचा तिरंगा ध्वज सर्वांचे आकर्षण ठरला असून, यात विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रस्त्यावर मोठे शक्तीप्रदर्शन केले.

​दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना द्यावा लागलेला राजीनामा हा लोकशाहीतील विद्यार्थी एकजुटीचा मोठा विजय असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. याच विजयाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातही 'टीईटी'सारख्या महत्त्वपूर्ण परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटीच्या गैरप्रकारांचा संताप व्यक्त करत, आता राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनीही तातडीने राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी या रॅलीतून करण्यात आली आहे. हा लढा इथेच थांबणार नसून, विद्यार्थ्यांच्या या वाढत्या रोषामुळे आणि राज्य सरकारला दिलेल्या थेट इशाऱ्यामुळे आता राज्याचा शिक्षण विभाग यावर कोणती ठोस पावले उचलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

लेबल: ,

सोमवार, २० जुलै, २०२६

सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ पुरोगामी विचार मंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..


सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ पुरोगामी विचार मंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

जनसंघर्ष न्यूज 

धुळे- महान पर्यावरणवादी, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांचे पुरस्कर्ते तसेच मेगसेसे पुरस्काराने सन्मानित सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ पुरोगामी विचार मंच, धुळे यांच्या वतीने सोमवार दि. २० जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. निट पेपरफुटी प्रकरण तसेच शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात सोनम वांगचुक यांनी लोकशाही आणि घटनात्मक मार्गाने उपोषण सुरू केले होते. मात्र, शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून १८ जुलै रोजी पहाटे पोलिसांनी त्यांना उपचाराच्या कारणास्तव ताब्यात घेतल्याचा तसेच आंदोलनातील कार्यकर्त्यांनाही अवमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप पुरोगामी विचार मंचाने केला. या घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींवर योग्य कारवाई करावी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी पुरोगामी विचार मंचाचे अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे उपाध्यक्ष गो. पी. लांडगे, प्रा. बाबा हातेकर, जी. डी. जाधव, पंडित गोसावी, पी. टी. बेडसे, मनोहर मोहीते, कॉ. एल. आर. राव, बी. ए. पाटील, पोपटराव चौधरी, वसंत पाटील, डॉ. श्रीकृष्ण बेडसे, हेमंत मदाने, विश्वास पगार, डॉ. पापालाल पवार, दरबारसिंग गिरासे, किशोर शेजवळ, एम. एच. मोहीते, गुलाब मोरे, रामकृष्ण शिंदे, बबनराव वानखेडे, दिपक सोनवणे, दिनेश निमोणकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, तालुका सचिव कैलास देसले, तालुकाध्यक्ष नितीन जाधव आदी उपस्थित होते. तसेच मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर, नवल ठाकरे, मोहंमद जैद, आसिफ शेख, सादिक शेख यांच्यासह संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेबल: ,

बुधवार, ८ जुलै, २०२६

धुळे शहरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करा; विशेष पथक स्थापन करण्याची युवा सेनेचे ॲड. पंकज गोरे यांची मागणी

 


धुळे शहरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करा; विशेष पथक स्थापन करण्याची युवा सेनेचे ॲड. पंकज गोरे यांची मागणी

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांना निवेदन सादर केले ; तातडीच्या कारवाईचे आश्वासन

जनसंघर्ष न्यूज 

   धुळे, दि. ७ (प्रतिनिधी): धुळे शहरातील वाढते अवैध धंदे, गुंडगिरी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि बिघडत चाललेली कायदा व सुव्यवस्था याबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांची भेट घेऊन युवासेना राज्य सहसचिव ॲड. पंकज गोरे यांनी सविस्तर निवेदन सादर केले.

    निवेदनात धुळे शहरातील सट्टा, पत्त्यांचे क्लब, अवैध दारू अड्डे व इतर बेकायदेशीर धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी विशेष स्कॉड स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर सातत्याने देखरेख ठेवणे, गुंडांची परेड घेणे, जामिनाच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणे आणि समाजकंटकांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची मागणीही करण्यात आली.

    सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून दहशत निर्माण करणारे व्हिडिओ व आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित होत असल्याने त्यांच्यावर आवश्यक निर्बंध घालावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

    महिलांच्या सुरक्षेसाठी शाळा, महाविद्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी दामिनी पथक अधिक सक्रिय करावे तसेच छेडछाडीच्या घटनांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.

      नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या "कायद्याचा बालेकिल्ला" या मोहिमेच्या धर्तीवर धुळे जिल्ह्यातही विशेष मोहीम राबवून अवैध धंदे, गुंडगिरी आणि समाजकंटकांविरोधात सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी ॲड. पंकज गोरे यांनी केली.

      यावेळी ॲड. पंकज गोरे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांचा वृक्ष भेट देऊन सत्कार केला. निवेदनाची गांभीर्याने दखल घेत येनपुरे यांनी संबंधित बाबींवर तातडीने कारवाई करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

लेबल: , , ,

मंगळवार, ७ जुलै, २०२६

महिला बचत गट योजनांतील कथित गैरव्यवहाराची SIT चौकशीची मागणी; १३ जुलैपासून आंदोलनाचा इशारा

महिला बचत गट योजनांतील कथित गैरव्यवहाराची SIT चौकशीची मागणी; १३ जुलैपासून आंदोलनाचा इशारा 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीमार्फत राबविण्यात आलेल्या ग्रामीण जीवन उन्नती अभियान (UMED) व मानव विकास योजना 2022-23 अंतर्गत महिला बचत गटांसाठी पुरविण्यात आलेल्या मशिनरी खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि पुरवठादार कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने सादर करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र SIT किंवा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यामार्फत वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात शासन निधीचा अपहार, निकृष्ट दर्जाची मशिनरी पुरवठा, महिलांची फसवणूक, चौकशीची दिशाभूल, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तसेच तक्रारदार महिलांवर दबाव टाकल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

तक्रारदारांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी व पुरवठादार कंपनीची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, कंपनीला ब्लॅकलिस्ट करावे, आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे आणि तक्रारदार महिला व साक्षीदारांना संरक्षण द्यावे, अशा मागण्या केल्या आहेत.
दरम्यान, आरोपांबाबत संबंधित अधिकारी किंवा संबंधित कंपनीची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. 

तसेच, आठ दिवसांत चौकशी सुरू न झाल्यास सोमवार, १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून दक्ष पत्रकार संघाच्या वतीने महिला बचत गटांच्या सदस्यांसह धरणे, भजन, आमरण उपोषण व बिऱ्हाड आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

लेबल: , ,

रविवार, ५ जुलै, २०२६

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात शिंदखेड्यात सर्वपक्षीय बैठक; १३ जुलै रोजी भव्य मोर्चाची घोषणा

 

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात शिंदखेड्यात सर्वपक्षीय बैठक; १३ जुलै रोजी भव्य मोर्चाची घोषणा

जनसंघर्ष न्यूज 

शिंदखेडा | प्रतिनिधी

आज, दि. ५ जुलै २०२६ रोजी शिंदखेडा येथील नगरसेवक राहुल भाऊ पाटोळे यांच्या संपर्क कार्यालयात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समिती, शिंदखेडा तालुका यांच्या वतीने सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीत आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात समितीची स्थापना करण्यात आली असून, दि. १३ जुलै २०२६ रोजी शिंदखेडा येथे भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

समितीच्या वतीने शिंदखेडा तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाज तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील (एससी) विविध समाजबांधवांना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा मोर्चा दि. १३ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेशद्वार येथून सुरू होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडी (शिंदखेडा), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), रिपब्लिकन एकतावादी, आदिवासी समाज, मुस्लिम समाज तसेच विविध बहुजनवादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बैठकीस रामभाऊ माणिक (दोंडाईचा नगरसेवक), राहुल भाऊ पाटोळे (शिंदखेडा नगरसेवक), दीपक अहिरे (शिंदखेडा नगरसेवक), अक्षय चव्हाण (दोंडाईचा नगरसेवक), अरविंदकुमार मंगासे (जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन एकतावादी), संजय पाटोळे (जिल्हा उपाध्यक्ष, आरपीआय), कैलास आखाडे (तालुकाध्यक्ष), प्रवीण मनसे (युवक जिल्हाध्यक्ष), मनोज पानपाटील (पँथर सेना तालुकाध्यक्ष), जतिन बोरसे, विजय मोरे, श्रीकांत बैसाणे, बाळा इशी, नवनीत बागले, रोहित पाटोळे, संजय पानपाटील, रवींद्र इशी, रावसाहेब पाटोळे, किरण शिरसाट, मनोज बोरसे, दीपक बोरसे, सागर बोरसे, अजय पाटोळे, बबलू कापुरे, तोसीब शेख, सोनू कुंभार, सिद्धार्थ कुवर, कुणाल पाटोळे, यशवंत पाटोळे यांच्यासह शिंदखेडा तालुक्यातील आंबेडकरी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात लोकशाही मार्गाने व्यापक जनजागृती करत १३ जुलैचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

लेबल: , , ,

शुक्रवार, ३ जुलै, २०२६

​धुळ्यात 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' नाटकावरून वाद; बॅनर्सची तोडफोड, प्रयोगावर बंदी घालण्याची मागणी

धुळ्यात 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' नाटकावरून वाद; बॅनर्सची तोडफोड, प्रयोगावर बंदी घालण्याची मागणी

अधिक वाचा »

लेबल: , , ,

गुरुवार, २ जुलै, २०२६

केंद्रीय राज्यमंत्री भगवत मकवाना यांना समाजभूषण सुभाष बोराडे यांच्याकडून विविध मागण्यांचे निवेदन


केंद्रीय राज्यमंत्री भगवत मकवाना यांना समाजभूषण सुभाष बोराडे यांच्याकडून विविध मागण्यांचे निवेदन

कुंभमेळा नियोजन समितीत समावेश, समाजभूषण पुरस्कार देशभर लागू करण्यासह पाच प्रमुख मागण्या; सकारात्मक आश्वासन

जनसंघर्ष न्यूज 

नाशिक | प्रतिनिधी

     नाशिक येथील देवळाली कॅम्प सिंधी पंचायत समिती हॉल येथे दि. २६ जून २०२६ रोजी केंद्रीय राज्यमंत्री भगवत मकवाना यांच्या शासकीय दौऱ्यादरम्यान समाजभूषण सुभाष पोपटराव बोराडे यांनी विविध सामाजिक व प्रशासकीय मागण्यांचे निवेदन सादर केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले.

     निवेदनात नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थींना सदस्य म्हणून नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली. तसेच देशातील सर्व राज्यांमध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सुरू करावा, अशी मागणीही करण्यात आली.

      याशिवाय नाशिक महानगरपालिका व कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये कायमस्वरूपी नोकरभरती करावी, नाशिक महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व शाळांचे पुनर्वसन करून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून द्यावे, तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डातील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अशा मागण्यांचाही समावेश निवेदनात करण्यात आला.

       यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भगवत मकवाना यांनी निवेदनातील मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या शासन स्तरावर सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच समाजभूषण सुभाष पोपटराव बोराडे यांना केंद्रीय समितीवर सदस्य म्हणून संधी मिळावी यासाठीही प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

       यावेळी रिपाई (आठवले) नाशिक जिल्हा उपाध्यक्ष समाजभूषण सुभाष पोपटराव बोराडे, संजय जाधव, आकाश घुसळे, रोहित सुनील भालेराव, विक्रांत बागुल, जेष्ठ नेते जमिलभाई सैय्यद यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाजसेवक उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर राजीव बिरसिंग रजोरा, भगवान कटारिया, राकेश बैद, संजय कल्याणी, निलेश बंगाली आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

लेबल: , ,

आमदार चेतन वसावा यांना राजकीय षडयंत्रपूर्वक खोटे केस मध्ये अडकवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करून आमदार वसावा यांना मुक्त करा - भिल समाज विकास मंच ची मागणी.


 

आमदार चेतन वसावा यांना राजकीय षडयंत्रपूर्वक खोटे केस मध्ये अडकवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करून आमदार वसावा यांना मुक्त करा - भिल समाज विकास मंच ची मागणी.

जनसंघर्ष न्यूज 

एरंडोल प्रतिनिधी - येथील भील समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आमदार चेतन वसावा यांच्यावर राजकीय षडयंत्रपूर्वक खोट्या केसेस मध्ये अडकवून त्यांना अटक करण्यात आली असल्याची बातमी ऐकुन आमदार वसावा यांना अडकवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यां ची एस आय टी चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन एरंडोल प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांना देण्यात आले.

        निवेदनात आदिवासी आवाज या न्यूज चॅनलवरील व्हिडिओ तसेच वर्तमानपत्रातील मजकूर वरील माहितीचे अवलोकन केले असता गुजरात मधील डेडियापाडा येथील आदिवासी आमदार चेतन वसावा यांना 2023 मधील कथित प्रकरणात जिल्हा न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.आमदार चेतर वसावा यांच्या सकट त्यांच्या सात दिवसाची बाळंतीण पत्नी व सात दिवसाचे निरागस बालकाला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे वृत्तपत्र व सोशल मीडियावर माहिती फिरत आहे तसेच दुसऱ्या बाजूला संपूर्ण भारतात त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यामध्ये काही महिन्यापूर्वी ते भाषणात सांगत आहेत की मला बीजेपी या राजकीय पक्षाकडून धमक्या येत आहेत ते मला त्यांच्या पक्षात सामील करण्यासाठी दबाव आणत आहे मी बीजेपी या पक्षात सामील नाही झालो तर मला फसवून संपवतील असा व्हिडिओ फिरत आहे म्हणून आम्हाला समस्त आदिवासी समाजाला व लोकशाही वर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची एक मागणी आहे की सदर घटनेची एस आय टी स्थापन करून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच वर्तमान मध्ये चेतर वसावा यांना वरील कोर्टात जामीन मंजूर करून त्यांना जेल मधून मुक्त करण्यात यावे अशी मागणी भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

     यावेळी महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा जळगाव जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सागर वाघ, एरंडोल तालुकाध्यक्ष भैय्या मोरे, युवा तालुकाध्यक्ष निहाल सोनवणे, लश्मण जावळे, पंढरीनाथ मोरे, सखाराम मोरे, वासुदेव गायकवाड,राजधर सोनवणे,करण सोनवणे, मोतीराम जावळे, हिरालाल सोनवणे,बादल ठाकरे,करण बेलदार,आकाश ठाकरे,अजय बेलदार, कुणाल अहिरे, दिपक सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

लेबल: , , , , ,

शनिवार, २७ जून, २०२६

प्रेषित पैगंबरांबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य: नाजिया खानवर गुन्हा दाखल करण्यासाठी माजी आ. फारुक शहांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

प्रेषित पैगंबरांबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य 

 नाजिया खानवर गुन्हा दाखल करण्यासाठी माजी आ. फारुक शहांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.. 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - शहराचे माजी आमदार फारुक शाह यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन त्यांना एक सविस्तर निवेदन दिले असून, या निवेदनात नाजिया खान या महिलेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनानुसार, नाजिया खान यांनी विविध सार्वजनिक कार्यक्रम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याबाबत कथितरीत्या आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या कथित प्रक्षोभक विधानांमुळे दोन समाजात वैमनस्य आणि तेढ निर्माण होऊन शहराची सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणाची आणि संबंधित व्हिडिओंची निष्पक्ष पोलीस चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या चौकशीत तथ्य आढळल्यास नाजिया खान यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी भूमिका माजी आमदार फारुक शहा यांनी मांडली आहे. हे निवेदन देताना त्यांच्यासोबत मतिन पठाण, सादिक शेख, तौफिक खाटीक, रफिक हाजी यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

लेबल: ,

सोमवार, २२ जून, २०२६

माहिती अधिकार नियम २०२६ लागू करून माहितीचा अधिकार कायद्याचा खून करणाऱ्यां विरोधात २५ जून रोजी आझाद मैदानावर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे धरणे आंदोलन.

 माहिती अधिकार नियम २०२६ लागू करून माहितीचा अधिकार कायद्याचा खून करणाऱ्यां विरोधात 
२५ जून रोजी आझाद मैदानावर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे धरणे आंदोलन.

जनसंघर्ष न्यूज 

        महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या माहिती अधिकार नियम २०२६ विरोधात राज्यभरात माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या मूळ उदिष्ट्यांशी व तरतुदींशी हे नियम विसंगत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (फेडरेशन) यांच्या मते माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मुलभूत लोकशाही हक्क असून तो दया किवा सवलत नसून तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे नव्याने लागू करण्यात आलेले नियम मागे घेऊन माहितीचा हक्क सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे. नवीन नियमांमुळे माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेत अनेक जाचक अडथळे निर्माण झाले आहेत. (अर्ज शुल्क १० वरून ३० रुपये, माहिती मिळवण्यासाठी पर पेज २ वरून ५ रुपये,) अर्ज शुल्क, अपील शुल्क, व प्रतिपादन शुल्कात वाढ, माहिती मागण्याचे कारण सांगण्याची सक्ती, तसेच नागरिकत्वाचा पुरावा जोडण्याच्या अटीवर आक्षेप घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर २५ जून २०२६ रोजी गुरुवारी सकाळी १०.०० ते ४.०० च्या वेळेत मुंबईतील आझाद मैदान येथे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आधी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने संपूर्ण राज्यातील पदाधिकारी सदस्य यांनी हजारो इमेल राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभाग यांना मेल पाठवण्यात आलेले आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील नेते, आमदार, खासदार यांना निवेदने दिली जात आहेत.

            या आंदोलनासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे (फेडरेशनचे) कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच या उपक्रमाला बळकटी देण्यासाठी समविचारी संस्था, संघटना, पत्रकार बांधव व नागरिकांनी ही मुख्यमंत्री व प्रधान सचिव सामान्य प्रशासन यांना मेल पाठवावेत. तसेच आझाद मैदान येथे होणारया आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे (फेडरेशनचे) संस्थापक अध्यक्ष सुभाषजी बसवेकर, राज्य उपाध्यक्ष शेखर कोलते, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष महेश पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य साहेबराव वाघ, किरण धुमाळ, यांनी केले आहे.

लेबल: , , , ,

शनिवार, २० जून, २०२६

आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते सैनिक कॉलनी जलकुंभ व पंपिंग स्टेशनचे लोकार्पण संपन्न

 

आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते सैनिक कॉलनी जलकुंभ व पंपिंग स्टेशनचे लोकार्पण संपन्न

अमृत 2.0 योजना अंतर्गत नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

जनसंघर्ष न्यूज

     धुळे, दि. 20 जून — धुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या दृष्टीने अमृत 2.0 योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सैनिक कॉलनी येथील जलकुंभ व पंपिंग स्टेशनचे लोकार्पण आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

     या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार धर्मयोद्धा अनुप भैय्या अग्रवाल यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी धुळे शहराच्या प्रथम नागरिक महापौर सौ. मायादेवी परदेशी तसेच धुळे महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास नगरसेवक सुभाष सुकलाल जगताप, नगरसेवक ललित गंगाधर माळी, नगरसेविका सौ. उज्वला रंजीत भोसले व नगरसेविका सौ. योगिता संजय कुटे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     सैनिक कॉलनी येथील जलकुंभ अनेक वर्षांपासून उभारलेला असला तरी पंपिंग स्टेशनच्या अभावामुळे त्याचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत नव्हता. पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर हा प्रकल्प पूर्णत्वास येऊन आज नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे.

     या जलकुंभामुळे प्रभाग क्रमांक १ मधील नगावबारी परिसर, कदमबांडे नगर, सैनिक कॉलनी, एकविरा पार्क, केसर पार्क तसेच झेंडा चौकापर्यंतच्या विविध कॉलनींना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी समान वितरण क्षेत्र असल्याने या उंच भागांमध्ये पाणी कमी दाबाने अथवा उशिराने पोहोचत होते. मात्र धुळे शहरातील सर्वात उंच ठिकाणी उभारलेल्या या जलकुंभामुळे आता संबंधित भागात एक दिवसाआड नियमित, मुबलक व विनाअडथळा पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

    यावेळी आमदार अनुप भैय्या अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी व आयुक्त नितीन कापडणीस यांनी अमृत 2.0 योजनेमुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत होत असलेल्या सुधारणांचा उल्लेख करत नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

      या प्रकल्पामुळे हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून धुळे शहराच्या विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

लेबल: , ,

धुळ्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


 धुळ्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जनसंघर्ष न्यूज 

धुळे, प्रतिनिधी :-  शहरातील गरुड मैदान येथे आज (20 जून 2026) सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच हजारो नागरिकांची उपस्थिती लाभली.

     कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी धुळे विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

     योग दिन संयोजन समितीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुमारे चार हजार नागरिक, विद्यार्थी, महिला तसेच शासकीय व खासगी संस्थांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. योगाभ्यासाद्वारे निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.

      उपस्थित मान्यवरांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संयोजक ओमप्रकाश खंडेलवाल यांनी प्रास्ताविक केले, तर योग प्रात्यक्षिकांचे संचालन डॉ. राजेंद्र निकुंभ यांनी केले.

      कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

लेबल: , , , ,

गुरुवार, १८ जून, २०२६

श्री गुरु अर्जन देव महाराज यांच्या पावन शहिदी गुरु पर्वा निमित्त गुरुद्वारात विविध कार्यक्रम संपन्न.


श्री गुरु अर्जन देव महाराज यांच्या पावन शहिदी गुरु पर्वा निमित्त गुरुद्वारात विविध कार्यक्रम संपन्न...

जनसंघर्ष न्यूज

धुळे :-  श्री गुरु अर्जन देव जी महाराज यांच्या पावन शहीदी गुरुपर्वानिमित्त धुळे येथील गुरुद्वारा श्री गुरु नानक साहिब जी येथे विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त वरद रक्त केंद्र, धुळे यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर पार पडले.
या रक्तदान शिबिराला शीख समाज बांधवांसह विविध समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. रक्तदानाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यासोबतच भाविकांसाठी शरबत वाटप करण्यात आले तसेच २४ तास अखंड गुरु दा लंगर आयोजित करण्यात आला होता. लंगरमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत प्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि सेवाभावी वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी अनेक शीख समाज बांधवांनी गुरुद्वारा श्री गुरु नानक साहिब जी येथे भेट देऊन गुरु अर्जन देव जी महाराज यांच्या शहादतीस अभिवादन केले. समाजसेवा, मानवता आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यासंदर्भात माहिती देताना धुळे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा दारा सिंग यांनी सांगितले की, गुरु अर्जन देव जी महाराज यांनी मानवतेसाठी दिलेले बलिदान हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मरणार्थ रक्तदान, शरबत सेवा आणि गुरु दा लंगर यांसारखे उपक्रम राबवून समाजसेवेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
गुरु अर्जन देव जी महाराज यांच्या शहीदी गुरुपर्वानिमित्त आयोजित या उपक्रमातून "मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा" हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

लेबल: , , ,

बुधवार, १७ जून, २०२६

मनपा अधिकाऱ्यांकडून कारवाईस टाळाटाळ; तक्रारदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न, उपायुक्तांच्या आश्वासनानंतर माघार

मनपा अधिकाऱ्यांकडून कारवाईस टाळाटाळ; तक्रारदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न ; उपायुक्तांच्या आश्वासनानंतर माघार

जनसंघर्ष न्यूज 

​         धुळे - शहरातील वीर सावरकर मार्ग, रमाबाई आंबेडकर नगर येथील एका गल्लीत बेकायदेशीर बांधकाम करून रस्ता बंद केल्याप्रकरणी स्थानिक रहिवासी नितीन शिंदे हे वर्षभरापासून मनपाकडे दाद मागत आहेत. आयुक्तांनी कारवाईचे आदेश देऊनही, अतिक्रमण विभागाचे अधिकारी प्रसाद जाधव, हेमंत पावटे आणि मोनीष पाटील यांनी कारवाई न करता राजकीय दबावाखाली अतिक्रमणधारकाला पाठीशी घातल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर, पैशांची मागणी पूर्ण न केल्याने अधिकाऱ्यांनी तक्रारदार शिंदे यांनाच त्यांचे घर पाडण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

​१६ तारखेला कारवाई न झाल्याने निराश झालेल्या नितीन शिंदे यांनी आज मनपा प्रशासनाला पूर्वकल्पना देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार ते टोकाचे पाऊल उचलण्यासाठी आले असता, मनपा उपायुक्तांनी मध्यस्थी करत त्यांची समजूत काढली. "आम्ही तुम्हाला कायदेशीर न्याय देऊ, असे कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका," असे ठोस आश्वासन उपायुक्तांनी दिल्यानंतर शिंदे यांनी प्रशासनाचा मान राखत आपला आत्मदहनाचा निर्णय मागे घेतला आहे. आता प्रशासन खरोखरच योग्य ती कायदेशीर कारवाई करून न्याय देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

लेबल: , ,

२.५ कोटींच्या नालेसफाई कामात महानगर पालिका आयुक्त पार्टनर भ्रष्टाचाराची चौकशी विभागीय समिती मार्फत करा शिवसेना उभाता पदाधिकाऱ्यांची मंत्रालयात नगर विकास राज्यमंत्र्यांकडे कारवाईचे मागणी


 २.५ कोटींच्या नालेसफाई कामात महानगर पालिका आयुक्त पार्टनर

भ्रष्टाचाराची चौकशी विभागीय समिती मार्फत करा 

शिवसेना उभाता पदाधिकाऱ्यांची मंत्रालयात नगर विकास राज्यमंत्र्यांकडे कारवाईचे मागणी

जनसंघर्ष न्यूज 

धुळे -  धुळे महानगरपालिका नालेसफाईतील भ्रष्टाचार संदर्भात आम्ही हे तिसरे पत्र वजा निवेदन आपणा स्वतःला मंत्रालयात भेटून देत असून यापूर्वीच्या तक्रारीची दखल घेवून आपण दि. 12/5/2026च्या पत्रान्वये आयुक्तांना सदर भ्रष्टाचार व गंभीर  अनियमिततेच्या संदर्भात चौकशी करुन तक्रारदारांना परस्पर कळविण्यात यावे, असे आदेश दिले आहेत.

आमची तक्रारच मुळात आयुक्तांविरुध्द आहे. कुंपणच शेत खात आहे. धुळ्याची कचरासफाई 2024 सालापर्यंत 25 लाख रु.त होत असतांना सन 2025साली 55 लाखाचे नालेसफाईचे टेंडर

 निघाले. नालेसफाई 10-20% देखील होत नव्हती. नालेसफाई हा महानगरपालिकेच्या तिजोरीवर डाका घालण्याचा प्रकार आहे. सन 2025 साली 55 लाखाचे टेंडर निघाले... नालेसफाई न करता 55 लाख हडप केले. तोंडाला रक्त लागल्याने यावर्षी प्रथम 1.49 कोटीचे टेंडर निघाले.  परंतु चार नगरसेवकांना हे टेंडर घ्यावयाचे असल्याने समर्थ कन्स्ट्रक्शन यांची निविदा सर्वांत कमी दराची आल्याने, त्यांची पंचायत झाली. या ठेकेदारास मॅनेज करु न शकल्याने सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्तांना हाताशी धरुन निविदा रद्द करण्यास भाग पाडले. निविदा रद्द करण्याचे कारण मुळीच संयुक्तीक व कायदेशीर नाही. निविदा का रद्द केली ? सर्वांत आधी या निविदा रद्द करण्याची अनियमितता व आयुक्तांनी केलेल्या अधिकाराचा दुरुपयोगाची चौकशी आवश्यक आहे.

फेरनिविदा काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तेव्हा त्याच रकमेची निविदा प्रसिध्द करणे कायद्याला धरुन होते. मात्र या ठेक्यात स्वत:ला 20% पार्टनर करुन घेतले. ते चार नगरसेवक व आयुक्त असे 5 जण या नालेसफाईच्या कामात पार्टनर आहे. ही चर्चा शहरात खुलेआम होतेय. आयुक्त पार्टनर झाल्याने त्यांना सदरची 1.49 कोटीची निविदा थेट 2.49 कोटी काढावी लागली.

फेरनिविदा काढावयाची असतांना रकमेत बदल अर्थात 2.49 कोटीचे टेंडर फक्त आयुक्त पार्टनर झाल्यामुळेच काढावी लागते, जे मुळात बेकायदेशीर होय. ही दुसरी गंभीर अनियमितता आहे.

शिवाय शहरात तेच 7 मुख्य नाले व 12 उपनाले असतांना लांबी, रुंदी, खोली तेवढीच असतांना फेरनिविदेमध्ये 1 कोटी रुपयाची वाढ कशी होवू शकते ?

4 सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक व आयुक्तच या कामात पार्टनर असल्याने, आम्ही यापूर्वी केलेल्या तक्रारीची दखल घेणे शक्यच नव्हते. उलट गेल्या 2-3 दिवसांपासून वृत्तपत्रांना 80% नालेसफाई झाली अशी खोटी माहिती देवून नागरिकांची व शासनाची फसवणूक करत आहेत. वृत्तपत्रांनी 80% नालेसफाईवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले.

म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी पहाणीला गेलो असता,मोतीनाला व सुशी नाला येथील पुलाजवळ थोडीफार सफाई करुन म्हणजे 500 मीटर देखील सफाई झालेली नाही. हे नाले 4-5 किमी लांबीचे आहेत. दैठणकर नगर, सिस्टेल क्लासेस, सिव्हील हॉस्पिटल, संघमा चौक, सिंचन भवन मागील नाला, जीटीपी कॉलनी नाला पूर्ण कचरा, मेलेले जनावरे पडलेले आढळले. तेथील नागरिकांनी इकडे कधीही नालेसफाई झाली नाही असे सांगितले. हे सर्व पुरावे, फोटो, व्हीडीओ आम्ही चौकशी दरम्यान सादर करु शकतो. इतर जे 11-12 उपनाले आहेत, त्याकडे हे लोक फिरकले देखील नाहीत. 49 कि.मी. चे नालेसफाईचे इस्टीमेट असतांना 4-5 किमी.ची नालेसफाई देखील झाली कि नाही ही शंकाच आहे.

ज्या ठिकाणी नालेसफाई म्हणजे थातुर-मातुर घाण, गाळ काढून नाल्यालगतच ढिगारे 15 दिवसांपासून पडून आहेत, ते उचलले जाणार नाहीत. पाऊस पडला म्हणजे ती सर्व घाण पुन्हा नाल्यात जमा होईल !

आमची नम्र विनंती आहे, अत्यंत जलद गतीने नाले सफाई कामाच्या चौकशीसाठी तज्ञ लोकांची समिती नेमून सर्वप्रथम फुगीर इस्टीमेट 2.49 कोटीचे ऑडीट करावे. इस्टीमेट मधील तरतूदी, वाहने, मशीन, साहित्य न वापरता फक्त जेसीबी मशीनने कचरा नाल्याच्या बाजुलाच ढकलण्यात आला आहे. नाल्याचे खोलीकरण तसेच रुंदीकरण न करता थातुर-मातुर व तकलादू काम ते देखील 15-20% पेक्षा जास्त नसेल ! इतकी लूट दिवसा-ढवळया होत आहे. किती टन गाळ, घाण काढणे अपेक्षित होते. नियमानुसार (डीएसआर) दर, निघालेला कचरा यांचे परिक्षण करावे. विभागीय चौकशी समिती नेमण्यात यावी.

आयुक्तांनी केलेल्या टेंडर भ्रष्टाचाराची चौकशी करावी. स्वत:च पार्टनर असल्याने काम न करताच बिले काढणे सोयीचे व्हावे म्हणून 80% नालेसफाईची बोंब मारणार्‍या आयुक्तांना बडतर्फ करावे, हे भ्रष्ट अधिकारी आहेत. यांचे पूर्वीचे रेकॉर्ड चांगले नसून हे अनेकदा अ‍ॅण्टीकरप्शन विभागामार्फत ट्रॅप झाले आहेत. म्हणून आपल्या स्तरावरुन नालेसफाईच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उपनेते सौ.शुंभांगी पाटील जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांनी थेट मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, अप्पर सचिव नगरविकास यांना प्रत्यक्ष भेट घेऊन केली, या संदर्भातील तब्बल १२१  रंगित गुगल मॅप छायाचित्रे व चलचित्र फिती देखील पुरावा म्हणून सादर करण्यात आल्या,या संदर्भात लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री यांनी शिवसेना पदाधिकारी यांना दिले.

लेबल: , , , , ,

मंगळवार, १६ जून, २०२६

जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रलंबित परिपत्रकासाठी धुळ्यात कोळी महासंघाचे आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रलंबित परिपत्रकासाठी धुळ्यात कोळी महासंघाचे आंदोलन ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जनसंघर्ष न्यूज 

​धुळे :- अनुसूचित जमातीतील बांधवांना आणि त्यांच्या रक्तनात्यातील व्यक्तींना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळण्याबाबत राज्य शासनाचे प्रलंबित परिपत्रक तत्काळ काढण्यात यावे, या मागणीसाठी कोळी महासंघाच्या वतीने आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोळी समाजाच्या या महत्त्वपूर्ण प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाला अधिकृत स्मरणपत्र देण्यात आले. या प्रलंबित परिपत्रकाबाबत जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे तातडीने व सकारात्मक पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली.

​या संदर्भात २० ऑक्टोबर २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर लागलेल्या विविध निवडणुका आणि आचारसंहितेचे कारण पुढे करत प्रशासनाकडून हे परिपत्रक जारी करण्यास कमालीची दिरंगाई झाली आहे. या प्रशासकीय उदासीनतेमुळे संपूर्ण कोळी समाजात तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे. शासनाने आता कोणतीही टाळाटाळ न करता हे परिपत्रक तात्काळ जारी करून कोळी बांधवांना न्याय द्यावा, अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कोळी महासंघाने दिला आहे.

लेबल: ,

सोमवार, १५ जून, २०२६

परळी युवक हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा - जनकल्याण मानवता मिशनच्या वतीने मागणी जनसंघर्ष न्यूज

 परळी युवक हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा 

जनकल्याण मानवता मिशनच्या वतीने मागणी

जनसंघर्ष न्यूज 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी : परळी वैजनाथ येथील युवक तोहिद केरातोवाण पगण यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावे, अशी मागणी जनकल्याण मानवता मिशनच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून संस्थापक अध्यक्ष फिरोज गफ्फार शेख यांनी ही मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तोहिद केरातोवाण पगण यांची निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह रेल्वेमार्गावर फेकून देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थता पसरली आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल व जलद चौकशी करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच हत्येमागील संपूर्ण कट, कारणे व संबंधित बाबींचा तपास करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे तसेच पीडित कुटुंबास आवश्यक संरक्षण व मदत उपलब्ध करून द्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रती पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

लेबल: , ,

रविवार, १४ जून, २०२६

अतिक्रमणावर कारवाई करा, अन्यथा १७ जूनला आत्मदहन; नितीन शिंदे यांचा जिल्हा प्रशासनाला अल्टिमेटम

 


अतिक्रमणावर कारवाई करा, अन्यथा १७ जूनला आत्मदहन; नितीन शिंदे यांचा जिल्हा प्रशासनाला अल्टिमेटम

जनसंघर्ष न्यूज 

वृत्त प्रतिनिधी : धनंजय गाळणकर

धुळे : शहरातील रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील सार्वजनिक वहिवाटीच्या जागेवरील कथित बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी वारंवार तक्रारी, अर्ज आणि निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या अर्जदार नितीन सुभाष शिंदे व परिसरातील नागरिकांनी धुळे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच धुळे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देत १६ जूनपर्यंत कारवाई न झाल्यास १७ जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनानुसार, रमाबाई आंबेडकर नगरातील एका सार्वजनिक बोळातील वहिवाटीच्या जागेवर कथित अतिक्रमण करून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम होत असून महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी, पंचनामा, मोजमाप आणि मार्किंग यांसारख्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. तसेच संबंधित प्रकरणात कारवाई करण्याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक शेराही देण्यात आला होता. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची कारवाई अद्याप झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. नितीन शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, २१ मे रोजी कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध असतानाही अतिक्रमण हटविण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित विभागातील काही अधिकारी जाणीवपूर्वक कारवाई टाळत असल्याचा संशय नागरिकांमध्ये बळावत आहे. वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. "वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने आम्ही अत्यंत निराश झालो आहोत. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांना मानसिक, सामाजिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे," असे नितीन शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, १६ जून २०२६ पर्यंत संबंधित अतिक्रमण हटविण्याची कारवाई न झाल्यास १७ जून रोजी सकाळी ११.३० वाजता धुळे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या घटनेस जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन तातडीने हालचाल करून अतिक्रमणाविरोधात कारवाई करणार का, याकडे आता धुळेकरांचे लक्ष लागले आहे.

लेबल: , ,

बुधवार, १० जून, २०२६

निकुंभे गावात ग्रामस्थाची हत्या; आरोपी कुटुंबाला हद्दपार करण्याची गावकऱ्यांची मागणी

निकुंभे गावात ग्रामस्थाची हत्या; आरोपी कुटुंबाला हद्दपार करण्याची गावकऱ्यांची मागणी

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - जिल्ह्यातील निकुंभे येथे शानाभाऊ शंभू पाटील या ग्रामस्थाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ८ जून रोजी शानाभाऊ पाटील यांच्यावर गावातीलच दशरथ किसन ठाकरे याने पाठीमागून लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पाटील यांचा दुसऱ्या दिवशी, ९ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ निकुंभे गावातील संतप्त ग्रामस्थांनी आज धुळ्याचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून प्रशासनाला निवेदन दिले आहे.

आरोपी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी गावात दहशत माजवली असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. शेतातील साहित्याच्या चोऱ्या करणे, दमदाटी करणे आणि खोटे आरोप करून त्रास देणे, असे प्रकार या कुटुंबाकडून होत असल्याच्या तक्रारी निवेदनात नमूद आहेत. या गुन्हेगारीला कंटाळून, मुख्य आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कायमस्वरूपी जिल्ह्यातून हद्दपार करावे, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे. योग्य कारवाई न झाल्यास गावातील शांतता धोक्यात येऊ शकते, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

लेबल: , ,

उपवर्गीकरणातून आरक्षण संपविण्याचा डाव , आगीशी खेळू नका , पॅंथर सेनेचा केंद्र,राज्य सरकारला इशारा.

उपवर्गीकरणातून आरक्षण संपविण्याचा डाव , आगीशी खेळू नका - पॅंथर सेनेचा केंद्र,राज्य सरकारला इशारा.

जनसंघर्ष न्यूज 

 धुळे - अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून समाजामध्ये फूट पाडण्याचे काम केले जात आहे. आरक्षण संपविण्याचा हा डाव आगीशी खेळू नका.आमच्याकडे गमविण्यासारखे काहीच नाही , असा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला आहे. ऑल इंडिया पॅंथर सेनेची आरक्षण बचाव यात्रा धुळ्यात आली आहे. रेस्ट हाऊस येथून ही यात्रा पोलिस अधीक्षक कार्यालयमार्गे  डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत आली.तेथे डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.यावेळी माध्यमांशी संवाद साधताना दीपक केदार म्हणाले की भारतीय संविधानाने दिलेले आरक्षण हे सामाजिक न्यायाचे साधन आहे.परंतु सद्या देशात संविधानिक हक्क, सामाजिक हक्क,अनुसुचित जाती,जमातीच्या आरक्षण व्यवस्थेवर विविध प्रकारचे संकट निर्माण होत असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे.अनुसुचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या  माध्यमातून अनुसुचित जातींमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे हे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे.शाहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी .त्यासाठी खटला जलदगती न्यायालयामार्फत चालविण्यात यावा.लोकशाही प्रकियेवर जनतेचा विश्वास अधिकदृढ होण्यासाठी ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका  घेण्यात याव्यात. बुद्धगया महाविहाराचा ताबा बौद्ध समाजाकडे देण्यात यावा, अशा मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात आल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार म्हणाले , विविध सामाजिक प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी.अन्यथा राज्यभर  तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा त्यांनी दिला. आरक्षण बचाव यात्रेत राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यासोबत महाराष्ट्राचे अध्यक्ष विनोद भोळे ,धुळे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते,प्रविण शिंदे,विशाल वाघ, कृष्णा पारधी, सतिष पाटील ,रत्नशील सोनवणे, दीपक वाडीले, गणेश वाघ, निलेश इंदवे , अशोक करंजे,युवराज बाविस्कर ,आबा अमृतसागर ,बंटी मगरे,शुभम समाधीर, दादा सोनवणे , सम्राट देवरे,पूजा चव्हाण ,ललिता जाधव,गौरव गवळी , यशवंत दुसाणे , राहुल वाघ,नितीन  म्हसदे , सागर चव्हाण, छोटू बैसाणे, कुणाल बैसाणे, अशपाक शेख, अताऊर रेहमान,वंदना बागुल,अविनाश बागुल,महेंद्र महाले,गौतम पगारे,भाऊसाहेब बळसाने, यांच्यासह मोठ्या संख्येने धुळेकर नागरिक सहभागी झाले होते.

लेबल: , , ,