शनिवार, ४ जुलै, २०२६

धुळ्यात ६ जुलैला हास्याचा महाधमाका; रंगदेवता थिएटर्सतर्फे 'ऑल दि बेस्ट' नाटकाचा प्रयोग

 


धुळ्यात ६ जुलैला हास्याचा महाधमाका; रंगदेवता थिएटर्सतर्फे 'ऑल दि बेस्ट' नाटकाचा प्रयोग

६ जुलै रोजी रात्री ८ वाजता हिरे भवन येथे रंगणार मराठी रंगभूमीवरील गाजलेले नाटक; पत्रकार परिषदेत माहिती

जनसंघर्ष न्यूज 

धुळे | प्रतिनिधी

मराठी रंगभूमीवरील सर्वाधिक गाजलेल्या आणि प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासोबतच अंतर्मुख करणाऱ्या 'ऑल दि बेस्ट' या नाटकाचा विशेष प्रयोग रविवार, दि. ६ जुलै रोजी रात्री ८ वाजता धुळ्यातील हिरे भवन येथे रंगणार आहे. रंगदेवता थिएटर्सतर्फे या नाटकाचे आयोजन करण्यात आले असून, याबाबतची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य तथा ज्येष्ठ नाट्य-चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते चंद्रशेखर पाटील आणि भटू चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, 'ऑल दि बेस्ट' हे मराठी रंगभूमीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेले नाटक आहे. हे नाटक केवळ विनोदी नसून, मानवी स्वभाव, मैत्री, संघर्ष आणि भावनिक नातेसंबंध यांचे प्रभावी चित्रण करणारे आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश हे नाटक देते.

नाटकातील चपखल संवाद, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, पात्रांमधील अप्रतिम ताळमेळ आणि अचूक टायमिंग ही या नाटकाची जमेची बाजू आहे. तीन वेगवेगळ्या स्वभावाच्या मित्रांची कथा आणि संकटाच्या काळात त्यांनी एकमेकांना दिलेली साथ प्रेक्षकांना भावनिकरीत्या जोडून ठेवते. त्यामुळेच हे नाटक अनेक वर्षांपासून रसिकांच्या पसंतीस उतरले असून आजही तेवढ्याच उत्साहाने पाहिले जाते.

'मैत्री, प्रेम आणि निखळ हास्य' यांचा सुंदर संगम असलेले हे नाटक संपूर्ण कुटुंबासह अनुभवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दरम्यान, नाटकाच्या तिकिटांची विक्री शिवतीर्थ, संतोषी माता चौक, जैन मंदिरासमोर तसेच हिरे भवन येथे सुरू आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर पाटील यांच्याशी मो. 91702052338 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

लेबल: , ,

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ