शनिवार, ४ जुलै, २०२६

धुळ्यात विनापरवाना गुंगीकारक कफ सिरपची वाहतूक उधळली; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

 


धुळ्यात विनापरवाना गुंगीकारक कफ सिरपची वाहतूक उधळली; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

शिरपूर येथील संशयिताकडून 18 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त; NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल

जनसंघर्ष न्यूज 

धुळे | प्रतिनिधी

धुळे जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुंगीकारक औषधांची विनापरवाना विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत शिरपूर येथील एका संशयिताला ताब्यात घेतले. या कारवाईत 18 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 160 बाटल्या गुंगीकारक कफ सिरप जप्त करण्यात आल्या आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 3 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदखेडा शहरातील रेल्वे स्टेशन रोड परिसरात सापळा रचला. यावेळी किरण वसंत सकटे (रा. मच्छीबाजार, शिरपूर) याच्या ताब्यातील बॅगची तपासणी केली असता Codeine Phosphate आणि Triprolidine Hydrochloride घटक असलेल्या Conez TR या कफ सिरपच्या 100 मिलीच्या 160 बाटल्या आढळून आल्या.

सदर औषधांची एकूण किंमत 18 हजार 400 रुपये असून संबंधिताकडे त्याबाबत कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीविरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 164/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 278, तसेच अंमली औषधी व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) 1985 आणि औषधी व सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. दीपक ठोके करीत असून आरोपीने ही औषधे कोठून आणली व त्यामागील रॅकेटचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सपोनि. दीपक ठोके व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लेबल: ,

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ