₹१.५२ कोटींचा वृक्षलागवड घोटाळा ? उच्च न्यायालयात रिट याचिका चौकशीची ऍड ऋतुराज वाघ यांची मोठी मागणी
₹१.५२ कोटींचा वृक्षलागवड घोटाळा ? उच्च न्यायालयात रिट याचिका चौकशीची ऍड ऋतुराज वाघ यांची मोठी मागणी
जनसंघर्ष न्यूज
धुळे | प्रतिनिधी :
पालधी–अमळनेर–शिंदखेडा–नंदुरबार या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या सुमारे ₹१.५२ कोटींच्या वृक्षलागवड व तीन वर्षांच्या संगोपनाच्या कामात कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.
ही याचिका धुळे येथील अॅड. ऋतुराज दिवंगर वाघ यांनी दाखल केली असून, राज्य शासन, जिल्हाधिकारी धुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच संबंधित कंत्राटदार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
याचिकेनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाने पालधी–अमळनेर–शिंदखेडा–नंदुरबार मार्गावर वृक्षलागवड व तीन वर्षांच्या संगोपनाचे काम मंजूर केले होते. या कामासाठी सुमारे ₹१.५२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत अनेक ठिकाणी अपेक्षित प्रमाणात वृक्षलागवड झालेली नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
याचिकाकर्त्यांनी न्यायालयात स्थळछायाचित्रे, भू-टॅग केलेले फोटो, Google Map लोकेशन आणि इतर पुरावे सादर केले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, प्रत्यक्ष काम पूर्ण न होता काम पूर्ण झाल्याचे दाखवून संबंधित बिले अदा करण्यात आल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
या संदर्भात यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र, कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्याने अखेर उच्च न्यायालयाचे दार ठोठावल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
रिट याचिकेत संबंधित कामाची स्वतंत्र चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे तसेच याचिकाकर्त्यांच्या निवेदनावर नियमानुसार निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
या प्रकरणाची सुनावणी लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात होण्याची अपेक्षा असून, या निकालाकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
लेबल: भ्रष्टाचार



0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ