घरफोडी करणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद; शिरपूर शहर पोलिसांची यशस्वी कारवाई
घरफोडी करणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद; शिरपूर शहर पोलिसांची यशस्वी कारवाई
शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर शहर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीचा सुमारे ₹74 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 1 जुलै 2026 रोजी रात्री 10.45 ते 2 जुलै 2026 रोजी दुपारी 12.00 या कालावधीत फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. यावेळी घरातून एलईडी टीव्ही, एसी आणि दोन लॅपटॉप असा एकूण ₹74 हजारांचा ऐवज चोरीस गेला होता. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 288/2026 अंतर्गत बीएनएस कलम 305(अ), 331(3) व 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना शिरपूर शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रविंद्र राजेंद्र पवार (रा. खुर्दे बुद्रुक, ता. शिरपूर, जि. धुळे) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने घरफोडीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेला एलईडी टीव्ही, एसी व दोन लॅपटॉप असा एकूण ₹74 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
शिरपूर शहर पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून, चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
लेबल: क्राईम न्यूज, जनसंघर्ष न्यूज



0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ