बुधवार, ८ जुलै, २०२६

धुळेसह राज्यभरात 'लँड जिहाद'चे संघटित रॅकेट? आमदार अनुप अग्रवाल यांचा विधिमंडळात गंभीर आरोप; एसआयटी चौकशीची मागणी.



धुळेसह राज्यभरात 'लँड जिहाद'चे संघटित रॅकेट?

 आमदार अनुप अग्रवाल यांचा विधिमंडळात गंभीर आरोप; एसआयटी चौकशीची मागणी.

जनसंघर्ष न्यूज 

धुळे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात कृषी जमिनींच्या खरेदी-विक्रीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर मुद्दा आज राज्य विधिमंडळात उपस्थित करण्यात आला आहे.

धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे राज्य शासनाचे लक्ष वेधत, हा प्रकार संघटित स्वरूपातील 'लँड जिहाद' असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक अर्थात एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आमदार अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी नसताना बनावट शेतकरी दाखले, खोटे ७/१२ उतारे, इतर राज्यांतील जमिनींचे कागदपत्र, बनावट वारस, तसेच शासनाच्या जमिनींच्या व्यवहारांद्वारे मोठ्या प्रमाणावर महसूल बुडविण्यात आला आहे. धुळे शहरातील देवपूर, वडजाई, पिंपरी आणि नरव्हाळ परिसरातील अनेक व्यवहार संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला.

यासोबतच या व्यवहारांमध्ये मोठ्या आर्थिक उलाढाली झाल्याने निधीचा स्रोत आणि परदेशी निधीचा वापर झाला आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात उत्तर देताना सांगितले की, राज्यभर अशा प्रकारच्या जमिनींच्या व्यवहारांची तपासणी सुरू असून, जमाबंदी आयुक्तांमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणामुळे राज्यातील कृषी जमीन व्यवहारांबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले असून, आता शासनाची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जन संघर्ष न्यूज, मुंबई/धुळे.

लेबल: , , ,

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ