मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांचा इशारा : 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन
मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांचा इशारा : 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन
जनसंघर्ष न्यूज
धुळे | प्रतिनिधीराज्यातील कार्यरत शिक्षकांवरील वाढत्या प्रशासकीय भार, पदोन्नती प्रक्रियेतील अडथळे, TET अनिवार्यता तसेच शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या विरोधात महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनांनी 9 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पदोन्नती प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणी दूर करून पात्र शिक्षकांना न्याय देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
तसेच सेवाज्येष्ठ शिक्षकांसाठी TET परीक्षेची सक्ती रद्द करावी, उत्तर प्रदेश व तेलंगणा राज्यांच्या धर्तीवर सवलती लागू कराव्यात, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदोन्नतीसंदर्भातील प्रश्न तातडीने निकाली काढावेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
निवेदनात शाळा व विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा आणणारे संवर्गनाश धोरण रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकांकडून निवडणूक व इतर अशैक्षणिक कामे करून घेतली जात असल्याने अध्यापन कार्यावर परिणाम होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
शासनाने शिक्षकांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 9 जुलै रोजी महाराष्ट्रभर शाळाबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धामक, सचिव चंद्रकांत साटोरा यांच्यासह विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन सादर करण्यात आले.
लेबल: जनसंघर्ष न्यूज, जिल्हा, शैक्षणिक



0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ