शनिवार, ४ जुलै, २०२६

२४ तासांत जबरी चोरीचा पर्दाफाश; चाळीसगाव रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

 

२४ तासांत जबरी चोरीचा पर्दाफाश; चाळीसगाव रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

एक आरोपी अटकेत; ५४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, दोन फरार आरोपींचा शोध सुरू

जनसंघर्ष न्यूज 

धुळे | प्रतिनिधी :

चाळीसगाव रोड पोलिसांनी जबरी चोरी व मारहाणीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत चार आरोपींच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोबाईल, रोकड व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ५४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

३० जून २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास धुळे शहरातील शंभर फूटी रोडवरील शासकीय दूध डेअरीजवळ फिर्यादीला अडवून मारहाण करण्यात आली. आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल, चार हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच मोबाईलद्वारे ऑनलाइन ९०० रुपये ट्रान्सफर करून पोबारा केला.

या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विवेक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत एकाला अटक केली.

अटकेतील आरोपीकडून चोरीस गेलेला मोबाईल, रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली. पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करत फरार आरोपींना अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू ठेवली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पवार तसेच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

लेबल: ,

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ