शुक्रवार, २९ मे, २०२६

मुख्याध्यापक पदावनती व वेतन कपात प्रकरणी विजय चौधरी आक्रमक; धुळे आदिवासी विभागाकडे तक्रार

मुख्याध्यापक पदावनती व वेतन कपात प्रकरणी विजय चौधरी आक्रमक; धुळे आदिवासी विभागाकडे तक्रार




जनसंघर्ष न्यूज 

आदिवासी आश्रमशाळांमधील कथित आर्थिक गैरव्यवहार, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून करण्यात आलेल्या कपाती तसेच मुख्याध्यापक पदावनती प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करणारे निवेदन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धुळे यांना देण्यात आले आहे. विजय धनजी चौधरी यांनी दिलेल्या निवेदनात सांगोवी (ता. शिरपूर) येथील अनुदानित आश्रमशाळेतील व्यवस्थापनाविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संस्थेच्या अध्यक्ष, कार्यकारिणी व संबंधित व्यवस्थापनाने शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बेकायदेशीर कपात करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या संदर्भात यापूर्वीही अनेक तक्रारी व पुरावे प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, शाळेतील काही कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा ठरावीक रक्कम कपात करण्यात आली असून त्या रकमांचा योग्य हिशोब नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या आदेशानुसार मुख्याध्यापक पदावनतीसंदर्भात स्पष्ट निर्देश असतानाही संबंधित प्रकरणात कार्यवाही होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शासन निर्णय आणि विभागीय आदेशांची अंमलबजावणी करून संबंधित पदावनतीचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याशिवाय, आर्थिक गैरव्यवहार व कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीबाबत स्वतंत्र चौकशी समिती नेमून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा न्यायालयीन तसेच कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. सदर निवेदनाच्या प्रती धुळे जिल्हाधिकारी, धुळे, पोलीस अधीक्षक, तसेच आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. या निवेदनामुळे संबंधित आश्रमशाळेतील कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.

विविध मागण्यांचे समाज कल्याण आयुक्तांना निवेदन - महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे.



विविध मागण्यांचे समाज कल्याण आयुक्तांना निवेदन - महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे.




जनसंघर्ष न्यूज 

नाशिक (प्रतिनिधी) आज दिनांक 29 मे 2026 शुक्रवार रोजी भिमटोला सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी नाशिक विभागाचे समाजकल्याण उपायुक्त श्री.माधव वाघ यांची भेट घेऊन निवेदन दिले..

निवेदनाचा विषय असा आहे की समाजकल्याण खात्यामार्फत दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील भूमिहीनांना जमिनी दिल्या जातात परंतु सरकारच्या जाचक अटी मुळे नाशिक विभागात प्रकरण मंजूर होत नाहीत त्यामुळे जाचक अटी रद्द करून प्रकरणे तातडीने मंजूर करा तसेच मुखेड ता. येवला येथील सत्याग्रह स्मारकाचे अर्धवट काम पूर्ण करा या व अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले..

याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे, निफाड तालुका अध्यक्ष संतोषभाऊ शेजवळ, तालुका उपाध्यक्ष भारत जाधव, गणेश अहिरे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे, रोहित अहिरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..!

इंधन दरवाढ आणि महागाईच्या भडक्याविरोधात धुळे काँग्रेस आक्रमक; अनोख्या 'घोडागाडी' रॅलीतून सरकारचा तीव्र निषेध.

इंधन दरवाढ आणि महागाईच्या भडक्याविरोधात धुळे काँग्रेस आक्रमक ; अनोख्या 'घोडागाडी' रॅलीतून सरकारचा तीव्र निषेध.

जनसंघर्ष न्यूज 

देशभरात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतींनी उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. याच वाढत्या महागाई, बेरोजगारी आणि कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवरून धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीने आज सत्ताधारी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून 'जनआंदोलन' छेडले. इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आधुनिक वाहने सोडून चक्क पारंपारिक 'घोडागाडीतून' लक्षवेधी मोर्चा काढत संपूर्ण धुळे शहराचे लक्ष वेधून घेतले. 

अवघ्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली मोठी वाढ आणि हजाराच्या पार गेलेले गॅस सिलिंडरचे दर, हा सर्वसामान्यांच्या खिशावर पडलेला थेट दरोडा असल्याचा घणाघाती आरोप करत धुळे काँग्रेसने आज सरकारविरोधात एल्गार पुकारला. 'इंधन दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो', असे बॅनर हाती घेत आणि थेट घोडागाडीत स्वार होत कार्यकर्त्यांनी शहरातून निषेध रॅली काढली व जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या दरवाढीमुळे ट्रॅक्टरचा वापर परवडेनासा झाल्याने शेतीची कामे खोळंबली असून, यामुळे पुन्हा एकदा महागाईचे दुष्टचक्र निर्माण झाल्याची टीका यावेळी स्थानिक नेत्यांनी केली. जनतेवरील हा अन्याय दूर करण्यासाठी आणि झालेली इंधन दरवाढ तत्काळ मागे घेऊन पुरवठा सुरळीत करावा, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने आज धुळ्याच्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना पक्षाच्या वतीने सविस्तर निवेदन सुपूर्द केले आहे.

लेबल: , , , , ,

सोमवार, २५ मे, २०२६

धुळ्यातील क्युमाईन क्लब परिसरात हमाल कामगारांचे आंदोलन; २७ मे पासून शासकीय धान्य गोदामे बंदचा इशारा

धुळ्यातील क्युमाईन क्लब परिसरात हमाल कामगारांचे आंदोलन ; २७ मे पासून शासकीय धान्य गोदामे बंदचा इशारा

जनसंघर्ष न्यूज 

​शासनाने नव्याने काढलेल्या वाहतूक आणि हाताळणी परिपत्रकामुळे हमाल कामगारांच्या रोजगारावर गदा आली आहे. शासकीय धान्य गोदामांचे काम थेट वाहतूक ठेकेदारांना देण्याच्या या निर्णयाविरोधात 'धुळे जिल्हा हमाल कामगार संघटने'च्या वतीने धुळ्यातील क्युमाईन क्लब परिसरात धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या धुळ्यातील ३०० आणि राज्यातील तब्बल १० हजार हमाल कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि गोदामातील काम केवळ नोंदणीकृत माथाडी कामगारांनाच मिळावे, या मागणीसाठी आंदोलकांनी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल तसेच जिल्हा प्रशासनाला सविस्तर निवेदन दिले आहे.

​कामगारांची थकीत मजुरी त्वरित मिळावी, अशी प्रमुख मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे. संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, २५ आणि २६ मे असे दोन दिवस हे धरणे आंदोलन सुरू राहील; मात्र तरीही शासनाने या प्रश्नाची दखल घेतली नाही, तर २७ मे पासून धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामांमधील कामकाज बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात येईल. पावसाळ्याच्या तोंडावर गोदामांचे काम बंद पडल्यास वितरण व्यवस्थेत मोठी अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लेबल: , ,

शनिवार, २३ मे, २०२६

अमृत पेयजल योजनेचा धुळे महानगरपालिका प्रशासनाने उडवला बोजवारा


अमृत पेयजल योजनेचा धुळे महानगरपालिका प्रशासनाने उडवला बोजवारा 

स्वतःला सर विश्वेश्वरया समजणारा पाणीपुरवठा अभियंता फिल्डवर कधीच जात नाही, म्हणून बिल्लासभर जमिनीत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकणाऱ्या ठेकेदार व अभियंत्यांना जाब विचारणार कोण?

14000 हजार वॉटर मीटर अमृत योजनेच्या माध्यमातुन रस्ते, गटारी, पिण्याच्या पाइपलाइन नसलेल्या भागात बसविण्याच प्रयोजन काय?

आधी दररोज पाणीपुरवठा करा? मगच वॉटर मीटर बसवा?

अमृत पेयजल योजना अधिकार यांनी चाटुन पुसुन खाल्ली?
धुळे महानगरपालिकेचे कारभारी नगरसेवक झोपलेत का?
शिवसेना उबाठा ने उघडकिस आणला आणखी एक भष्टाचार

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - केंद्र सरकारने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दुर व्हावी या हेतूने अमृत एक व अमृत दोन या योजना देशभरातील 500 शहरांमध्ये राबवल्या, त्यात सहाजिकच धुळे शहराचा देखील समावेश झाला, धुळे शहरात अमृत एक योजने अंतर्गत शहरभर नविन पाइपलाइन 450 किलोमिटर क्षेत्रात टाकणयात आली,व नविन जलकुंभ देखील उभारण्यात आले,असं असतांना हि पाईपलाईन ना सुरू झाली ना नव्याने बांधण्यात आलेल्या जलकुंभात पाणी टाकण्यात आले, त्यातच अमृत दोन योजना केंद्र सरकारने आणली यात अजुन काही गोष्टी समाविष्ट करून नागरिकांना पुरेसे पेयजल मिळावे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या महत्वकांक्षी योजनेचा बोजवारा धुळे महानगरपालिकेतील स्वतः ला सर विश्वेश्वरया समजणाऱ्या पाणीपुरवठा अभियंता यांनी उडविला,आणी भ्रष्टाचाराच्या पाण्यात हि योजना धुळे करांच्या डोळ्या समोर वाहुन जाताना आज धुळे कर पहातो आहे.
धुळे शहरातील नगावबारी परिसरातील प्रभाग क्रमांक 7 मधील इंद्रप्रस्थ व सैनीक काॉलनीत चक्क बिल्लासभर जमिनीत ही पाइपलाइन टाकण्यात आली असून,या भागात अजुनही रस्ते गटारी, पिण्याचे पाणी नागरिकांना मिळत नसताना बिल्लासभर अंतरावर पिण्याच्या पाईपलाईन टाकुन व वॉटर मीटर बसवुन या भागातील नागरिकांची चेष्टा उडविण्याच काम महानगरपालिका प्रशासन करीत असल्याचे दिसून आले.या संदर्भात या भागातील नागरिकांनी शिवसेना उबाठा कडे विनंती करुन ह्या कामा संदर्भात आपण आवाज उठवावा हि विनंती केल्यावर शिवसेना उबाठा महानगर प्रमुख धीरज पाटील, उपमहानगर प्रमुख कपिल लिंगायत, तेजस सपकाळ आदींनी भेट दिल्यावर सदर प्रकार उघडकीस आला. तसेच या भागात नळांना बसविण्यात आलेल्या वॉटर मीटर ची फिटिंग हि व्यवस्थीत करण्यात आलेली नसुन, वरचेवर हे वॉटर मीटर बसविण्यात आले आहेत, हे मीटर चोरटे कधीही लंपास करु शकतात इतकी तकलादू फिटिंग करण्यात आली असून, पाइपलाइन टाकणातांना लाईन लेव्हल. कडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.या संदर्भात शिवसेना पक्षाच्या वतीने मनपा आयुक्त, मुख्य सचिव नगर रचना, विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार सादर करणार असून या संदर्भात कामचुकारपणा व भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. धुळे शहरात धुळे महानगरपालिका वतीने मुबलक पाणीसाठा असताना देखील सध्या पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असून वर्षाला फक्त साठच दिवस धुळे महानगरपालिका नागरिकांना पाणी पुरवते त्या बदल्यात नागरिक वार्षिक पाणीपट्टी कर भरतात, आधी दररोज पाणीपुरवठा करा मगच वॉटर मीटर बसवा ही आग्रही मागणी धुळे महानगरपालिका आयुक्तांकडे शिवसेना करणार असून केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांना धुळे महानगरपालिकेतील अधिकारी व प्रशासन भ्रष्टाचाराने पोखरून अशाप्रकारे तकलादू पद्धतीने कामे करत असतील तर या शहराच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये आणून देखील या शहरात विकासाचे प्रकल्प उभे राहणारच नाहीत त्यासाठी महानगरपालिकेतील सत्ताधारी कारभारी नगरसेवकांनी झोपेचे सोंग घेणे बंद करावे असे आव्हान शिवसेना पक्षाच्यावतीने शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, संघटक प्रशांत भदाने, महानगर प्रमुख धीरज पाटील, निंबा मराठे, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, प्रशांत ठाकूर ,भूषण पाटील, अण्णा फुलपगारे शिवाजी शिरसाळे, डॉ. अनिल पाटील, जव्हार पाटील, राजेंद्र ढवळे, सुनील पाटील ,आबा भडांगे ,मुन्ना पठाण, सुभाष मराठे ,पंकज भारस्कर ,दिनेश पाटील, कपिल लिंगायत ,सुनील चौधरी ,महादू गवळी, हिमांशू परदेशी ,संदीप चौधरी ,सागर निकम ,पिनू सूर्यवंशी, अजय चौधरी, अनिल चौधरी ,रामदास कानकाटे, निलेश कांजरेकर ,वैभव पाटील, सागर साळवे, गोकुळ बडगुजर, शुभम मंदिर, अमोल ठाकूर, आदींनी केले आहे. 

लेबल: , , , , ,

“पावसाळ्यापूर्वी गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारा; ‘मी धुळेकर’चे मनपा प्रशासनाला निवेदन”

मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्या नेतृत्वाखाली पावसाळ्यापूर्वी शहरातील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याबाबतचे निवेदन अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना सादर करताना पदाधिकारी

 “पावसाळ्यापूर्वी गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारा; ‘मी धुळेकर’चे मनपा प्रशासनाला निवेदन”

जनसंघर्ष न्यूज 

धुळे : शहरातील रस्त्यांवरील गतिरोधकांवर तातडीने पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्या नेतृत्वाखाली धुळे मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना निवेदन देण्यात आले. धुळे शहरातील मुख्य रस्ते तसेच कॉलनी परिसरातील अनेक रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने वाहन चालकांना ते वेळेवर लक्षात येत नाहीत. त्यामुळे अचानक ब्रेक लावावे लागून वाहन चालकांचा तोल जाण्याची शक्यता वाढत असून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने लहान-मोठे अपघात घडत असून वाहनांचे नुकसानही होत असल्याचे संघटनेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. आता पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यात रस्ते ओले असल्याने अचानक ब्रेक लावल्यास वाहने घसरण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व गतिरोधकांवर तातडीने पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी “मी धुळेकरचे" अध्यक्ष निरंजन भतवील, दिनेश वाघ, छोटू भाऊ पोतदार, फरदीन शेख, आफ्रिदी शेख आदी उपस्थित होते.

लेबल: , , ,

बुधवार, २० मे, २०२६

मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून वगळण्याचा निर्णय मनुवादी विचारसरणीचा; संविधान संरक्षण समितीचे तीव्र आंदोलनाचा इशारा.

मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून वगळण्याचा निर्णय मनुवादी विचारसरणीचा; 

संविधान संरक्षण समितीचे तीव्र आंदोलनाचा इशारा


जनसंघर्ष न्यूज
 

धुळे- संपूर्ण महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाला समतेच्या तत्त्वातून वगळून त्यांच्या संविधानिक हक्कांपासून वंचित ठेवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने घेतलेला “मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून वगळण्याचा” निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती करून तीव्र आंदोलने छेडण्यात येतील, असा इशारा संविधान संरक्षण समितीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. संविधान संरक्षण समितीचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २० मे २०२६ रोजी धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा पूर्णपणे असंविधानिक असून सामाजिक समता व न्यायव्यवस्थेला हरताळ फासणारा आहे. हा निर्णय मनुवादी विचारसरणीने प्रेरित चातुर्वर्ण व्यवस्थेला बळ देणारा असून मागासवर्गीय समाजाविषयी द्वेषभावना ठेवून घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, भारतातील मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या सुमारे पंच्याऐंशी टक्के असताना त्यांना केवळ पन्नास टक्के आरक्षण दिले जाते. तर विशिष्ट पंधरा टक्के समाजाला पन्नास टक्के खुला प्रवर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत उच्च गुणवत्ताधारक मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून वगळणे म्हणजे मोजक्या पंधरा टक्के खुल्या प्रवर्गाला अतिरिक्त लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे निवेदनात म्हटले आहे. “शूद्र-अतिशूद्र” अर्थात मागास व इतर मागासवर्गीय समाजाला त्यांच्या संवर्ग व प्रवर्गातच मर्यादित ठेवून, त्यांच्याकडे बौद्धिक पात्रता व गुणवत्ता असूनही खुल्या प्रवर्गातील प्रवेश व संधी नाकारणे हे मनुवादी वृत्तीचे जाहीर प्रतीक असल्याचा आरोप समितीने केला आहे. संविधानातील “सर्वांसाठी समानता” या तत्त्वानुसार उच्च गुणवत्ताधारक मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गात स्थान देणे हा त्यांचा संविधानिक हक्क असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना “प्रवर्गासह खुला प्रवर्ग” असा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तातडीने आदेश काढावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल व त्यास शासनच जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री अण्णासाहेब हरिश्चंद्र लोंढे, प्राचार्य बाबा हातेकर, सेवा निवृत्त पोलीस अधिकारी पंडीत गोसावी, बबन वानखेडे, दिपकुमार साळवे, महेंद्र पाटील, मनोहर मोहिते, पंडितराव बेडसे, भगवान वाघ, कॉ. पोपटराव चौधरी, श्रीकृष्ण बेडसे, विजय भामरे, छोटूभाऊ मोरे, धनंजय गाळणकर आदी उपस्थित होते.

लेबल:

सोमवार, १८ मे, २०२६

धुळे लळिंग टोल नाक्यावर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाहनांना टोलमुक्त प्रवेश देण्याची मागणी

धुळे लळिंग टोल नाक्यावर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाहनांना टोलमुक्त प्रवेश देण्याची मागणी

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- ऑल इंडिया पँथर सेना, धुळे जिल्हाच्या वतीने धुळे लळिंग टोल नाका प्रशासनाला निवेदन देऊन सामाजिक न्यायासाठी कार्य करणाऱ्या संघटना, पदाधिकारी, नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाहनांना टोलमुक्त प्रवेश देण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने सागर भाऊ मोहिते यांच्या वतीने करण्यात आली आहे.

ऑल इंडिया पँथर सेना धुळे जिल्हा युनिट च्या निवेदनात म्हटले आहे की, समाजावर कुठेही अन्याय, अत्याचार अथवा गंभीर घटना घडल्यास सामाजिक संघटनांच्या  पदाधिकाऱ्यांना तातडीने त्या ठिकाणी जावे लागते. पीडितांना मदत, प्रशासनाशी समन्वय तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी सतत जिल्हा व राज्यभर दौरे करावे लागतात.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार हे देखील महाराष्ट्रभर सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने दौरे करत असून त्यांचे वाहन तसेच संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांच्या वाहनांना टोलमुक्त प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अधिकृत ओळखपत्र (ID Card) देण्यात आले असून ID Card पाहून संबंधित वाहनांना विनाअडथळा सोडण्यात यावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच अन्याय, अत्याचार व जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या सर्व सामाजिक संघटना, पक्ष, नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाहनांनाही टोलमुक्त सवलत लागू करावी, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना धुळे जिल्हा युनिट च्या वतीने केली आहे.

दरम्यान, टोल प्रशासनाने या मागणीवर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ऑल India पँथर सेना, धुळे जिल्हाच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष सागर भाऊ मोहिते, धुळे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण भाऊ शिंदे, शिरपूर तालुका अध्यक्ष दिपक भाऊ वाडिले धुळे शहर सचिव बंटी मगरे, सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ सोनवणे, शुभम समदीर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


लेबल: , ,

शनिवार, १६ मे, २०२६

खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या पुढाकारातून धुळे शहर-तालुक्यात विकासाला गती; बांबुर्ले प्र. नेर,येथे रस्ते काँक्रिटीकरण व सभामंडप कामांचे भूमिपूजन

खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या पुढाकारातून धुळे शहर-तालुक्यात विकासाला गती

बांबुर्ले प्र. नेर, गोवर्धननगर, पूजा प्रोव्हिजन परिसर व लक्ष्मीनगर येथे रस्ते काँक्रिटीकरण व सभामंडप कामांचे भूमिपूजन


जनसंघर्ष न्यूज 

धुळे -  दि.१६ धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या विशेष प्रयत्नातून आणि नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीच्या अनुषंगाने धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहर व धुळे तालुका परिसरात विकासकामांचा वेग वाढला असून विविध महत्त्वाच्या कामांची प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत या कामांचे भूमिपूजन खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या शुभहस्ते पार पडले. धुळे शहर आणि तालुक्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची अवस्था खराब असल्याने नागरिकांना दैनंदिन वाहतुकीत अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आवश्यक असणाऱ्या सभामंडपांची मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित होती. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. परिणामी आज या विकासकामांचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.या अंतर्गत बांबुर्ले प्र. नेर येथे सभामंडप उभारणीचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक ०२ मधील पूजा प्रोव्हिजन परिसरात रस्ता काँक्रिटीकरण, प्रभाग क्रमांक ०१ मधील गोवर्धननगर येथे रस्ता काँक्रिटीकरण, तसेच धुळे शहरातील लक्ष्मीनगर येथे सभामंडप बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.या विकासकामांमुळे संबंधित परिसरातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. काँक्रिटीकरणामुळे रस्त्यांचे आयुष्य वाढणार असून पावसाळ्यात होणाऱ्या चिखल व खड्ड्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. तसेच सभामंडप उभारणीमुळे सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी स्थानिक नागरिकांना हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.

यावेळी बोलताना खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी सांगितले की, “धुळे शहर आणि तालुका हा माझ्या लोकसभा मतदारसंघाचा महत्वाचा भाग आहे. नागरिकांच्या गरजा आणि स्थानिक विकास हा माझा प्राधान्यक्रम आहे. रस्ते, सभामंडप यांसारख्या मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळातही विकासकामांचा हा वेग कायम ठेवून अधिकाधिक निधी मंजूर करून आणण्याचा प्रयत्न केला जाईल.” नागरिकांनीही या विकासकामांबाबत समाधान व्यक्त करत, धुळे शहर व तालुक्यात विकासाच्या दिशेने सुरू झालेली ही घोडदौड पुढेही अखंड सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.धुळे शहर-तालुक्यातील विविध भागात सुरू झालेली ही कामे केवळ रस्ते आणि सभामंडपांपुरती मर्यादित नसून, संपूर्ण परिसराचा विकास अधिक गतिमान करण्यासाठीचा ठोस पाया ठरणार असल्याचे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लेबल: , ,

गुरुवार, १४ मे, २०२६

३०-४० वर्षांची आरोग्याची प्रतीक्षा संपली ;प्रभाग क्रमांक १ मध्ये NHUM अंतर्गत नागरी आरोग्य दवाखान्याचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

३०-४० वर्षांची आरोग्याची प्रतीक्षा संपली; आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक ललित माळी यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

प्रभाग क्रमांक १ मध्ये NHUM अंतर्गत नागरी आरोग्य दवाखान्याचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- शहरातील उत्तरेकडील भागात वास्तव्यास असलेल्या सुमारे ५० ते ६० हजार नागरिकांना मागील ३० ते ४० वर्षांपासून प्राथमिक आरोग्य सुविधा सोयीच्या अंतरावर उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. आरोग्य सेवांसाठी दूर अंतरावर जावे लागत असल्याने सर्वसामान्य, गरीब व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या गंभीर प्रश्नाची दखल घेत नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी मागील अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते.

धुळे शहराचे कार्यसम्राट आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांनी नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या अत्यंत महत्त्वाच्या मागणीस प्राधान्य देत नव्या नागरी आरोग्य दवाखान्याच्या उभारणीस भक्कम पाठबळ दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनिक स्तरावरील आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आल्या व प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठीचे मार्ग मोकळे करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्या संवेदनशील व विकासाभिमुख नेतृत्वाचे कौतुक करण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या National Health Mission अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या National Urban Health Mission (NHUM) योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक १ मधील फॉरेस्ट कॉलनी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या नागरी आरोग्य दवाखान्याचे उद्घाटन धुळे शहराच्या महापौर सौ. मायादेवी परदेशी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

शहरातील गरीब, सर्वसामान्य व वंचित नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी यासाठी नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत हा दवाखाना मंजूर करून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेली ही सुविधा प्रत्यक्षात आणण्यात त्यांना यश मिळाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या उपक्रमासाठी नगरसेवक सुभाषजी जगताप, सौ. योगिता कुठे व सौ. उज्वला भोसले यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सरचिटणीस सुनीलजी कपिल, अमोल भाऊ मराठे व संदीप भाऊ गुरव यांनीही सदर दवाखान्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करून या उपक्रमाला सहकार्य केले.

NHUM अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या दवाखान्यामध्ये नागरिकांना OPD तपासणी, रक्त तपासणी, औषध वितरण, माता व बाल आरोग्य सेवा, गर्भवती महिलांची तपासणी व मार्गदर्शन, लसीकरण, रक्तदाब व मधुमेह तपासणी, कुटुंब नियोजन सेवा तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळणार आहे.

विशेषतः झोपडपट्टी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा दवाखाना मोठा आधार ठरणार असून मोफत उपचारामुळे नागरिकांची आर्थिक बचत होणार आहे. वेळेत उपचार मिळाल्यामुळे गंभीर आजार टाळण्यास मदत होणार असून महिलांचे व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी “सुदृढ नागरिक हेच सक्षम समाजाचे बळ आहे” हा संदेश देत नागरिकांनी शासनाच्या आरोग्य सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.

उद्घाटन प्रसंगी कॉलनीचे सचिव रवींद्र इंगळे, शिवाजी माळी, अरुण कळाल, दिलीप सुरशे, चौधरी साहेब, मयुर धात्रक, रुपेश सूर्यवंशी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेबल: , , ,

बुधवार, १३ मे, २०२६

महेश पाटील यांना शिवविजय फाउंडेशन चा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव पुरस्कार जाहीर

महेश पाटील यांना शिवविजय फाउंडेशन चा
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव पुरस्कार जाहीर.


 
जनसंघर्ष न्यूज 

भगूर चे सुपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त शिवविजय फाउंडेशन, भगूर यांच्यावतीने दिला जाणारा “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव पुरस्कार २०२६” जाहीर झाला आहे. शिवसेना उपनेते विजय करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोषित झालेल्या या पुरस्कारांचे वितरण २९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार आहे.

यंदाचा मनाचा सामाजिक क्षेत्रातील “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव पुरस्कार २०२६” महेश मोतीलाल पाटील, यांना सामाजिक, शैक्षणिक, व पर्यावरण या कार्यासाठी प्रदान करण्यात येणार आहे. तसे पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र संस्थेचे प्रमोद घुमरे यांनी दिले आहे.  इतर पुरस्कारांमध्ये जेष्ठ नेते एकनाथ शेटे (जीवन गौरव पुरस्कार), महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन चे उपकार्याध्यक्ष नारायणशेठ वाजे (सहकार), भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी (राजकीय), नाशिक मनपाचे माजी नगरसेवक आणि सर्जन डॉ. राजेंद्र जाधव (आरोग्य), जेष्ठ उद्योजक उत्तमराव शिंदे (उद्योग), भगूररत्न हभप गणेश महाराज करंजकर ( अध्यात्म), मुंबई येथील जेष्ठ साहित्यिक जयेश मेस्त्री (साहित्य), नाशिक तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष जेष्ठ पत्रकार सुधाकर गोडसे (पत्रकारिता), प्रयोगशील युवा शेतकरी गणेश निसाळ (कृषी), आंतरराष्ट्रीय क्रीडापटू संग्राम गायकवाड ( क्रीडा), महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यरत चित्रा भवरे ( महिला सबलीकरण), एरंडोलच्या पुस्तकांचा बगीचा या अभिनव उपक्रमाचे शिल्पकार आणि सध्या छत्रपती संभाजी नगर महापालिकेतील उपायुक्त विकास नवाळे (शासकीय सेवा), उपक्रमशील अध्यापक आणि व्याख्याते प्रा. हेमंत टिळे ( शिक्षण). प्रसिद्ध नृत्यांगना शिवानी जोशी (कला/संस्कृती). यांचा समावेश आहे. तसेच संस्थात्मक पातळीवर “नाशिक रोड शिवजन्मोत्सव सोहळा समिती” ला संस्था पातळीवर सन्मानित केले जाणार आहे.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत शिवविजय फाउंडेशनचे सावरकरांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. या सोहळयाला सावरकर प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक शिवविजय फाउंडेशनने केले आहे.


सोमवार, ११ मे, २०२६

जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या जिजाऊ कन्यांनी राखली यशाची परंपरा कायम.

जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या जिजाऊ कन्यांनी राखली यशाची परंपरा कायम.

जनसंघर्ष न्यूज 

धुळे:- फेब्रुवारी -मार्च 2026 मध्ये संपन्न झालेल्या विभागीय मंडळाच्या उच्च माध्यमिक व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचा निकाल नुकताच अनुक्रमे दिनांक 02 व 08 मे 2026 रोजी घोषित झाला त्यात 
श्री.शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थींनीनी यशाची परंपरा कायम राखत विद्यालयाच्या नावलौकीकात भर टाकली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल  92.50% लागला असून त्यात कु.खुशी कैलास माळी 10 वी हीने 86.20 % गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकावला तर 10वी क ची कु.गायत्री विलास शिरसाठ हिने
 86 % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु.देवयानी सुरेश पाटील हिने 85.60 %गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांक पटकावला तसेच उच्च माध्यमिक विभागातून कु.प्रतिक्षा नाना कापुरे 71%गुणांसह प्रथम कु.अमृता आनंदा गवळी 68.33%द्वितीय तर तृतीय क्रमांक कु.सनोबर अजिम शेख हिने 68% गुणासह पटकावला 
यशस्वीतांचे संस्थेचे चेअरमन धुळे ग्रामीणचे जलदुत मा.आमदार कुणालबाबा पाटील संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.एस.टी.पाटील, तथा सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .
यशस्वीतांचे विद्यालयाच्या प्राचार्य सौ.अपर्णा विजय पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून सन्मानित केले प्रसंगी उपमुख्याध्यापिका श्रीमती एस.व्ही.अडकमोल, जेष्ठ शिक्षक ,श्री. मनोहर मगर,मुकेश येवलेकर,संजय देवरे   संदीप परदेशी, चंद्रकांत ई.पाटील, रमेश यादव, उमेश भदाणे, सचिन रवंदळे,  मनोज पी.पाटील, लक्ष्मण के.गवळी,चंद्रकांत टी पाटील, अभिजीत पाटील, लक्ष्मीकांत ठाकरे, तथा सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

लेबल: ,

रविवार, १० मे, २०२६

“पक्ष्यांची तहान भागविण्याचा संकल्प; ‘मी धुळेकर’तर्फे मातीच्या वाडग्यांचे वितरण”

 

“पक्ष्यांची तहान भागविण्याचा संकल्प; ‘मी धुळेकर’तर्फे मातीच्या वाडग्यांचे वितरण”

जनसंघर्ष न्यूज 

धुळे : वाढत्या उन्हाळ्यामुळे पक्ष्यांना पाणी व अन्नाची कमतरता भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर मी धुळेकर संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना पक्ष्यांसाठी मातीच्या वाडग्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम अँड. चैतन्य भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून परिसरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. तसेच अनेक झाडे सुकल्याने पक्ष्यांना पाणी व अन्न मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत घरांच्या छतांवर व अंगणात पक्ष्यांसाठी पाणी व दाण्यांची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी जाणीव, आपुलकी आणि पर्यावरण संवर्धनाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने रवींद्रनाथ टागोर शाळा येथील विद्यार्थ्यांना मातीचे वाडगे वाटप करण्यात आले. यावेळी अँड. चैतन्य भंडारी यांनी विद्यार्थ्यांना निसर्गासाठी पक्ष्यांचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने पक्ष्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे संचालक विनायक चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास निरंजन भतवाल, छोटूभाऊ पोतदार, दिनेश वाघ, फरदीन शेख तसेच मोठ्या संख्येने पालक, शिक्षक व शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.

लेबल: , , ,

बुधवार, ६ मे, २०२६

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात केला जाहीर सत्कार

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात केला जाहीर सत्कार

जनसंघर्ष न्यूज 

धुळे प्रतिनिधी - सिध्दार्थ मोरे 

      धुळे :- जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित जयहिंद हायस्कूल सलग्न कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा उत्कृष्ट निकाल लागल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन श्री. निलेश पाटील होते. प्रमुख उपस्थितीत शालेय समिती सदस्य डॉक्टर नितीन काकडे, श्री. भूषण सावंत, सदस्या श्रीमती भारतीताई भामरे, प्राचार्य श्री. डी. व्ही. निकम, उपप्राचार्या श्रीमती करंदीकर, पर्यवेक्षक श्री. बिपिन सोनवणे, प्रवीण बोरसे व संजय देवरे ,प्रा एस एस चौधरी सर आदी उपस्थित होते.यावेळी विज्ञान शाखेत संयुक्त प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कु. गीतांजली ठाकरे व कु. निरीक्षा टोणेपे, प्रथमेश अहिरराव, आदित्य भावसार, तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वाणिज्य शाखेतील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. गरिमा छाजेड, द्वितीय वेदांत भट्टड, तृतीय कृष्णा बागड,व कला शाखेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कु. अनम पिंजारी, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या रेणुका चौधरी, तृतीय क्रमांक यमन खान यांचाही गौरव करण्यात आला.
संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “कठोर परिश्रम, शिस्त व सातत्य यांच्या जोरावरच हे यश मिळते,” असे मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षकांनी केले. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी भर पडली असून सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

लेबल: , ,

मंगळवार, ५ मे, २०२६

नवनियुक्त श्री. विशाल आनंद (IPS) यांनी पोलीस अधीक्षक, धुळे पदाचा स्विकारला पदभार


नवनियुक्त श्री. विशाल आनंद (IPS) यांनी पोलीस अधीक्षक ,धुळे पदाचा स्विकारला पदभार

जनसंघर्ष न्यूज 

       धुळे :- दिनांक 21/04/2026 रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक, धुळे मा. श्री. श्रीकांत धिवरे (IPS) यांची जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर बदली झाल्याने ते कार्यमुक्त झाले होते.

    त्यानंतर गृह विभागाचे आदेशाने मा.श्री. विशाल आनंद (IPS) यांची अमरावती ग्रामीण ते धुळे जिल्हा अशी बदली झाली असुन, दि.04/05/2026 रोजी सायंकाळी 06.00 वा. मा. श्री. विशाल आनंद (IPS) यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारला आहे. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, पोलीस उप अधीक्षक श्री. ज्ञानेश्वर जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विश्वजित जाधव, श्री. राजकुमार उपासे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. श्रीराम पवार, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. विनोद पाटील, सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री. अभिजित सोनवणे, राखीव पोलीस निरीक्षक श्री. मुकेश माहुले व शहर वाहतुक शाखेचे सपोनि. प्रशांत महाले असे उपस्थित होते.

       मा.श्री. विशाल आनंद (IPS) हे सन 2014 तुकडीचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी असून, ते महाराष्ट्र केडरमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी यापुर्वी नागपूर ग्रामीण व अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणुन काम पाहिले आहेत्यांनी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी (IITR) मधुन इलेक्ट्रिकल इंजिनियरींग शिक्षण घेतले आहे. त्यांचा सामुदायिक पोलीसींग, जातीय सलोखा राखणे आणि ग्रामीण भागातील गुंतागुंतीच्या तपासांचे व्यवस्थापन यावर विशेष भर आहे.

लेबल: , , ,

सोमवार, ४ मे, २०२६

नसरापूरच्या चिमुकलीला न्याय मिळवण्यासाठी अभाविप आक्रमकआरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्या- अभाविप

नसरापूरच्या चिमुकलीला न्याय मिळवण्यासाठी अभाविप आक्रमक आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्या - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे निदर्शने  


जनसंघर्ष न्यूज

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीने महात्मा गांधी स्मारक येथे पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेल्या बलात्कार व निर्घृण हत्येचा अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांच्या नेतृत्वात तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आले. 
       पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि तिची निघृण हत्या ही घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाला जखम करून गेली आहे. घरासमोर निरागसपणे खेळणाऱ्या त्या चिमुकलीला आरोपीने फसवून गोठ्यात नेले, तिच्यावर अमानुष अत्याचार केला आणि नंतर तिची निर्दयी हत्या करून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना केवळ एका कुटुंबावर आलेले दुःख नसून संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलतेला हादरा देणारी आहे. शिक्षण, संस्कार आणि पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात एका चार वर्षांच्या मुलीला देखील सुरक्षितता मिळत नसेल, तर ही अत्यंत गंभीर आणि लज्जास्पद बाब आहे.
     अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. त्या चिमुकलीच्या आई-वडिलांवर आणि कुटुंबावर जे दुःख कोसळले आहे, त्याची कल्पनाही असह्य आहे. एका निष्पाप मुलीची स्वप्ने, तिचे बालपण आणि तिच्या कुटुंबाचा आनंद एका विकृत मानसिकतेने हिरावून घेतला आहे. आज संपूर्ण राज्यभरातून उमटणारा संताप हा फक्त भावनिक नाही, तर व्यवस्थेला जागे करणारा आक्रोश आहे. नसरापूर परिसरात नागरिक रस्त्यावर उतरले, आंदोलने झाली, महामार्ग रोखण्यात आले आणि "चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे" ही भावना सर्वत्र व्यक्त झाली आहे. आरोपीवर यापूर्वीही महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वेळेत कठोर कारवाई झाली असती, तर कदाचित आज एका निष्पाप चिमुकलीचा जीव वाचला असता, त्यामुळे या प्रकरणात केवळ आरोपीलाच नव्हे, तर अशा गुन्हेगारांना मोकळे रान मिळू देणाऱ्या व्यवस्थेचाही गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे.
      अभाविपची ठाम मागणी आहे की, या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी. राज्य शासनाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) निष्पक्ष आणि वेगवान तपास करून दोषारोपपत्र तातडीने दाखल करावे. तसेच राज्यातील सर्व शैक्षणिक परिसर, गाव आणि सार्वजनिक ठिकाणी मुलींच्या सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा उभारणे अत्यावश्यक आहे.
      अशा घटनांमधील आरोपीचा आणि त्यांच्या विकृत प्रवृत्तीचा निषेध करावा तितका कमीच आहे, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून दोषी व्यक्तीला फाशी शिक्षा देण्यात यावी, आज समाजातील प्रत्येक घटकाने राजकारण, जात, पक्ष आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून अशा विकृत प्रवृत्तीविरोधात एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. मुलीची सुरक्षा, सन्मान आणि न्याय हा कोणत्याही समाजाचा मूलभूत पाया असतो. त्या पायालाच हादरे देणाऱ्या घटनांविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कायम रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ठामपणे आवाज उठवत राहील, असे मत अभाविप धुळे शहरमंत्री मयुरी जाधव यांनी व्यक्त केले आहे.
     यावेळी अभाविप धुळे शहर मंत्री मयुरी जाधव, मयुरी ढिवरे, मनिष कुलकर्णी, जयेश मोरे, केदार जोशी, प्रिया जैन सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

लेबल: , ,