मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२६

आय.आय. टी विद्यार्थी साहिल वाकोडे संस्थात्मक हत्या ची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी : सत्यशोधक विद्यार्थी संघटना.

आय.आय. टी. विद्यार्थी साहिल वाकोडे संस्थात्मक हत्या ची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी : सत्यशोधक विद्यार्थी संघटना






जनसंघर्ष न्युज 

धुळे -  शिक्षणातील ब्राह्मणीकरण, बाजारीकरण व जातीय भेदभावामुळे होणाऱ्या संस्थात्मक खुनाबाबत तसेच साहिल वाकोडे यांच्या प्रकरणात तातडीची कारवाई करण्याबाबत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी धुळे यांना  निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात आली.
        सत्यशोधक विद्यार्थी संघटना, धुळे यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय पुढीलप्रमाणे आम्ही  आपले लक्ष शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या गंभीर प्रवृत्तींकडे वेधू इच्छितो. जागतिकीकरणाच्या काळात शिक्षणाचे ब्राह्मणीकरण व बाजारीकरण जोरदार सुरू झाले आहे. या प्रक्रियेत शिक्षण महाग होत असून, विशेषतः भौतिक उन्नती साधणाऱ्या व प्रतिष्ठित संस्थांमधून मिळणारे शिक्षण उच्च जातवर्गीयांची मक्तेदारी बनविण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवरूनही दिसून येत आहे. परिणामी दलित-बहुजन विद्यार्थ्यांसाठी समान संधीचे दरवाजे संकुचित होत आहेत.
      अशा जातिव्यवस्थाक अडथळ्यांना लांघून प्रवेश मिळविणारे दलित-बहुजन विद्यार्थी विकृत जाती मानसिकतेचे शिकार बनविले जात आहेत. रोहित वेमुला, पायल तडवी व साहिल वाकोडे यांसारख्या अनेक तरुणांचे संस्थात्मक खून जातीपुरुषसत्तेने केले आहेत. या घटनांमध्ये शैक्षणिक संस्थांमधील भेदभाव, मानसिक छळ व दबाव यांची स्पष्ट छाया दिसते. असे संस्थात्मक खून पचवण्यासाठी दलित-बहुजन गुणवत्ताविहीन असतात या जातीय मानसिकतेचा आधार घेऊन पीडितांनाच बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जाते. सध्याचे शासन उच्च जातवर्गीयांची पाठराखण करणारे असल्याने दलितद्वेषाला खतपाणी मिळून अशा व्यक्ती व संस्था अधिक मुजोर बनल्या आहेत.
       या पार्श्वभूमीवर साहिल वाकोडे यांच्या संस्थात्मक खुनाला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर तातडीने कठोर व पारदर्शक कारवाई करण्याची आमची मागणी आहे. अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन सुरू करण्याचा इशारा आम्ही देत आहोत. न्याय मिळणे व भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपण तातडीने योग्य ती चौकशी व कारवाई करावी, ही नम्र विनंती. यावेळी सिद्धांत बागुल ,केतन निकम,हर्ष मोरे,धनंजय जगतापश्वेता गवळे,नीलिमा भामरे,मयुरी जाधव,प्रसिका जगदेव,तन्मय ठोसर,सोनाली अहिरे उपस्थित होते.

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२६

धुळे महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाला अखेर मान्यता; दीपक (बंटी) सुरेश खोपडे यांची नियुक्ती



धुळे महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाला अखेर मान्यता ; दीपक (बंटी) सुरेश खोपडे यांची नियुक्ती

एम आय एम चे विरोधी पक्षनेता बनण्याचे स्वप्न भंगले; शहर विकास आघाडीला विरोधी पक्षनेता पदाची जबाबदारी 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे : धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष व शहर विकास आघाडी मनपा धुळे गटनेते श्री. शाह शाहबाज फारूक शाह यांच्या पत्रानुसार, महापौर सौ. मायादेवी महादेव परदेशी यांनी नगरसेवक श्री. दीपक (बंटी ) सुरेश खोपडे यांना विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता दिली आहे.

महापौरांनी दिलेल्या पत्रात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १९ एक अ अ (२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ही मान्यता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष आणि शहर विकास आघाडी मनपा धुळे यांच्या गटनेत्यांच्या पत्रानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्राची प्रत माहितीस्तव व योग्य कार्यवाहीसाठी मनपा आयुक्त तसेच नगरसचिव यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.

या निर्णयामुळे धुळे महानगरपालिकेच्या आगामी सभांमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून दीपक (बंटी) सुरेश खोपडे यांची अधिकृत भूमिका राहणार असून, महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय समीकरणांना यामुळे नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

लेबल: , ,

रविवार, २७ सप्टेंबर, २०२६

हिरे वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता यांच्या हस्ते लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ फलकाचे अनावरण.

 हिरे वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता यांच्या हस्ते लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ फलकाचे अनावरण.





जनसंघर्ष न्युज 


भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धुळे येथे  दिनांक २४ सप्टेंबर २०२६, गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटना, मंत्रालय मुंबई यांच्या वतीने संघटनेच्या फलक अनावरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला.

या फलकाचे अनावरण माननीय अधिष्ठाता डॉ अजित  पाठक , वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकरम खान , संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  गिरीश चौधरी तसेच डॉ. अरुणकुमार नागे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळावे, कर्मचारी वर्गाच्या विविध प्रश्नांना व अडचणींना योग्य व्यासपीठ मिळावे आणि संघटना अधिक सक्षम व प्रभावीपणे कार्यरत राहावी, यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 *कार्यक्रमास राज्य कार्याध्यक्ष  चंद्रकांत भदाणे, राज्य सचिव  विनोद सोनार, राज्य महिला अध्यक्ष  सरलाबाई शिरसाट, राज्य महिला सचिव कांताबाई वर्पे, राज्य ज्येष्ठ सल्लागार  वामनराव पाटील, तसेच धुळे जिल्हाध्यक्ष  राहुल वाघ,   नंदकिशोर अंबेरे,  गोकुळ पाटील, संजू खैरनार,   अनिल मराठी,  विजय सूर्यवंशी,  अक्षय महाले , धीरज चव्हाण,   संजय माळी, सुनिता गायकवाड,   मिनाबाई गायकवाड,  शोभा अंबुरे,   संजीवनी उईके ,  राधेश्याम देसाई, विठ्ठल तिथे ,भगवान खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 तसेच  देवा पगारे , ताराचंद पाटील,  सोमनाथ सोनार,  पवन डांमरे,  विशाल हिरवाळे, कांतीलाल कल्याणी, गणेश गोयर, रेखा पवार,  अनिता लोहरे,  प्राची देशमुख,  अविनाश एडके,  करवादास सूर्यवंशी, देविदास पाटील , सिद्धार्थ जोंधळे,  दुर्गेश लोखंडे,  महेंद्र गोयर, रवींद्र बोरसे , संदीप परदेशी,  गोलू चावरे , सोमनाथ बैसाणे,  देविदास चावरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणारे सर्व अधिकारी, कर्मचारी , पदाधिकारी व मान्यवर यांचे महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. गिरीश भाऊ चौधरी व धुळे जिल्हाध्यक्ष श्री. राहुल वाघ यांनी मनःपूर्वक आभार मानले. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी असेच सहकार्य व मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२६

गरोदर महिलेची पेट्रोल टाकून जाळून हत्या ; 275 किमी दूर नेऊन थरारक कट! मोहाडी नगर पोलिसांनी 6 पैकी 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या

 


गरोदर महिलेची पेट्रोल टाकून जाळून हत्या ; 275 किमी दूर नेऊन थरारक कट! मोहाडी नगर पोलिसांनी 6 पैकी 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या

अनैतिक संबंधाच्या संशयातून खुनाचा धक्कादायक कट; CCTV, वाहन क्रमांक आणि तांत्रिक तपासातून पोलिसांनी अवघ्या 3 दिवसांत उलगडले रहस्य

जनसंघर्ष न्यूज 

धुळे : गरोदर महिलेवर पेट्रोल ओतून जाळून हत्या केल्याच्या अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकरणाचा मोहोळीनगर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत छडा लावला आहे. तब्बल 275 किलोमीटर दूर नेऊन महिलेची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 6 आरोपींना अटक केली आहे.

दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4.58 वाजता गर्भवती महिला गंभीर अवस्थेत आढळून आली होती. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत तिच्या शरीरावर गंभीर भाजल्याच्या खुणा आढळल्या. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली.

पोलिसांनी महामार्गावरील CCTV फुटेज, वाहनांची माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पुढे नेला. संशयित वाहनाचा शोध घेतल्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट झाली. पोलिसांच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील एका सांस्कृतिक कला केंद्रातून आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिस तपासानुसार, सरफराज उर्फ शफीक अलीम मोमीन (वय ३८), आरिफ उर्फ खुन्या आरिफ शेख (वय ३१), स्वाती उर्फ आरती गणेश कुटे (वय २८), रश्मी बालाजी पवार (वय ३०), फारुख शेख आणि रोहिणी जाधव यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनाक्रमाची पडताळणी केली. महिलेची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. ३२२/२०२६, BNS कलम १०३(१) अन्वये नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मोहाडीनगर पोलिसांकडून सुरू आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

लेबल:

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६

शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने.

शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने


जनसंघर्ष न्युज 

     धुळे -   गुणवत्तापूर्ण शिक्षण हा या देशातील प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. उशिरा का असेना कांही उणिवांसह शिक्षण हक्काचा कायदा आपल्या देशात झाला. पण अलीकडे राज्य आणि केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाचा आधार घेत नवनवे शासन निर्णय करून या देशातील दलित, आदिवासी, भटके विमुक्त, बहुजन कष्टकरी शेतकरी, अल्पसंख्याक समूहातील मुलामुलींचा शिक्षणाचा हक्कच काढून घेत आहे. आज महाराष्ट्रातील साडे तीन हजार सरकारी शाळा बंद पडल्या आहेत. पंधरा हजारहून अधिक सरकारी शाळा बंद पाडल्या जाणार आहेत. ज्या प्राथमिक शिक्षणावर उच्च शिक्षणाचा डोलारा उभा आहे त्याचे सक्षमिकारण करण्याऐवजी त्याचे कंगालीकरण केले जात आहे. सर्व सरकारी प्राथमिक शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये बंद करून शिक्षण व्यवस्थेचे खाजगीकरण करणारी धोरणे आखली जात आहेत. या शाळांच्या मधून शिक्षण घेणाऱ्या दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, बहुजन कष्टकरी शेतकरी आणि अल्पसंख्यांक समूहातील मुलामुलीना शिक्षणातून हद्दपार केले जात आहे. मुलींच्या शिक्षणाची वाट तर कायमची बंद होणार आहे.
आज महाराष्ट्रात ६४८८४ सरकारी शाळा आहेत. त्यातील १७८ शाळांना स्वतःची इमारत नाही. ४०१ शाळांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ५२२३ शाळांत मुलासाठी तर ३०९५ शाळांत मुलींसाठी स्वछतागृह नाही. १०१९३ शाळांना खेळाचे मैदान नाही.४६८४ शाळांत वीज कनेक्शन नाही. महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या ही विदारक अवस्था आहे. म्हणूनच सरकारी शाळांचे कंगालीकरण थांबवून सार्वजनिक शिक्षणवेवस्थेचे मजबूतीकरण करण्यासाठी शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंचच्या नेतृत्वाखाली ५ ऑक्टोबर २०२६ पासून महत्वाच्या पाच मागण्या घेऊन आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येत आहे.या आंदोलनापुर्वी शासनापर्यंत आमचे म्हणणे पोहचावे यासाठी सदर निवेदन देण्यात येत आहे.
मागण्या -: 
(१) २० पटसंख्येपेक्षा कमी पटसंख्या असल्याचे कारण सांगून शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय तातडीने मागे घेतला पाहिजे. गाव, तांडा, वाडी, वस्ती तिथे शाळा हेच धोरण कायम ठेवले पाहिजे. विद्यार्थी असला तरी ती शाळा चालू ठेवली पाहिजे. प्रत्येक वर्गाला स्वतंत्र्य शिक्षक दिला पाहिजे.(२) गुणवत्तापूर्ण शिक्षणावर गंभीर परिणाम करणारा १५ मार्च २०२४ रोजी घेतलेला संचमान्यतेचा शासन निर्णय तातडीने मागे घेतला पाहिजे. शाळा व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक मिळाला पाहिजे.(३) नवीन शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षणाचे खाजगीकरण, आणि बाजारीकरण वेगाने होणार आहे. १००० विद्यार्थी संख्येच्या अटीमुळे खेड्यापाड्यातील छोट्या शहरातील महाविद्यालये बंद होणार आहेत. दलित, आदिवासी, ग्रामीण, बहुजन-कष्टकरी, भटके विमुक्त, अल्पसंख्यांक समूहातील मुलामुलींना उच्च व महाविद्यालयीन शिक्षणातून हद्दपार केले जाणार आहे.त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण रद्द केले पाहिजे.(४) शिक्षणातील विषमता नष्ट करायची असेल तर केजी टू पीजी सर्वाना मोफत, गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण मिळाले पाहिजे.(५) शिक्षणावर होणारा खर्च हा नाममात्र असून तो वाढवत वाढवत राष्ट्रीय उत्पन्नाच्या दहा टक्केपर्यंत नेला पाहिजे(६) शालेय कामाच्या कालावधीत शिक्षकांचे मोबाईल बंद ठेवण्यात यावे त्यामुळे अध्यापन करणे सुलभ होईल. (७) मराठी शाळांना अनुदान देण्यात यावे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येऊन निवेदन देण्यात आले .यावेळी  सिद्धार्थ जगदेव,संजय पवार ,प्रवीण कुमार लाडे,भूपेश वाघ,युसुफ पापा सर ,विनोद रोकडे ,चंद्रकांत सत्तेसा,व्ही टी.गवळे, आप्पासाहेब तायडे,अशपाक खाटिक,मुकेश वाघ, मुकेश निकम, सुरेश सोनवणे, हर्षदा पाटील ,नीलिमा भामरे ,गुलाबराव वाघ, ईश्वर बैसाणे, शमसुल हसन, विशाल जाधव, मोहसीन शेख ,हेमंत भडक , शरद वेंदे, अमीन कुरेशी, नंदिनी पाटील, अशोक सोनवणे,  अब्दुल रऊफ सर, विलास महाले, नितीन पाटील, स्मिता सराट, ॲड.अरुण ढिवरे, अत्ताउरहमान , रियाज अहमद, खतीब सर, नवल ठाकरे, गौस रझा, श्वेता गवळे, देविदास जगताप, मधुकर निकुंभे , प्रविण गवळे, महेंद्र फुलपगारे,प्रशांत फुलपगारे,प्रकाश पाटील,केतन निकम, नानाभाऊ महाले , धनंजय जगताप, प्रसिका जगदेव, हर्ष मोरे.सिद्धांत बागुल, उपस्थित होते.

लेबल: ,

‘जयंती २’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायाचा धडा; आरक्षण आणि संविधानिक मूल्यांवर घडले विचारमंथन

 


‘जयंती २’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायाचा धडा; आरक्षण आणि संविधानिक मूल्यांवर घडले विचारमंथन

धुळ्यात विद्यार्थ्यांसाठी सामाजिक विषयावरील चित्रपटाचे आयोजन; जातीय भेदभाव व आरक्षणाबाबतच्या गैरसमजांवर संवाद

जनसंघर्ष न्यूज 

धुळे | दि. २४ सप्टेंबर २०२६

महाविद्यालयीन परिसरातील जातीय भेदभाव, सामाजिक पूर्वग्रह, आरक्षणाबाबतचे गैरसमज आणि संविधानिक मूल्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने धुळ्यात ‘जयंती २’ या मराठी चित्रपटाचे विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले. मयुरी जाधव यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

‘जयंती २’ या चित्रपटातून सामाजिक पार्श्वभूमीमुळे एका आदिवासी विद्यार्थिनीला महाविद्यालयीन वातावरणात करावा लागणारा भेदभाव, त्यातून निर्माण होणारा संघर्ष आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारे गैरसमज यांचे चित्रण करण्यात आले आहे.

चित्रपटातील पायल या आदिवासी विद्यार्थिनीला सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागतो. अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर तिच्यावरच निलंबनाची कारवाई केली जाते. त्यानंतर विद्यार्थी तिच्या समर्थनार्थ एकत्र येत निष्पक्ष चौकशीची मागणी करतात. या कथानकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर सामाजिक अन्याय, समानता आणि प्रतिनिधित्वाचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यात आले.

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर विद्यार्थ्यांमध्ये आरक्षणाच्या विषयावरही चर्चा घडवून आणण्यात आली. आरक्षणाचा विचार केवळ आर्थिक परिस्थितीपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक मागासलेपणा, समान संधी, प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्याय या व्यापक संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.

तसेच, ‘आरक्षण केवळ दहा वर्षांसाठी होते’ या प्रचलित गैरसमजाबाबत घटनात्मक तरतुदींच्या संदर्भात माहिती देण्यात आली. राजकीय प्रतिनिधित्वासाठी असलेल्या आरक्षणाच्या तरतुदी आणि शिक्षण तसेच सरकारी सेवांमधील आरक्षणाच्या तरतुदींमधील फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला.

भारतीय संविधानातील अनुच्छेद १५(४) आणि १६(४) मधील तरतुदींच्या संदर्भात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक तसेच राज्यसेवांमध्ये अपुरे प्रतिनिधित्व असलेल्या मागास वर्गांसाठी करण्यात आलेल्या विशेष तरतुदींवरही चर्चा करण्यात आली.

चित्रपटानंतर सामाजिक न्याय, समता, बंधुता, समान संधी, प्रतिनिधित्व आणि संविधानिक मूल्ये या विषयांवर विद्यार्थ्यांमध्ये विचारमंथन झाले. सामाजिक विषयांवरील चित्रपटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची, चर्चा करण्याची आणि सामाजिक वास्तवाकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या उपक्रमात आदित्य मोरे, आर्यन रामराजे, चिरंजीत मोरे, गौतमी वानखेडे, काव्या कोकणे, प्रसाद मोरे, विराज मोरे, वंश केदार, यश वानखेडे, अमोल नन्नवरे, मोहित मोरे, नागेश वानखेडे, दुर्गेश वानखेडे, शौर्य नेरकर, भावेश खैरनार, मनीष मोरे, सुहास रामराजे आणि अनिल केदार यांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांना चित्रपट दाखविण्यासाठी बौद्ध महासभेचे सदस्य सुहास रामराजे आणि अनिल केदार यांनी आर्थिक सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक विषयावरील चित्रपट पाहण्यासोबतच सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांवर विचार करण्याची संधी मिळाली.

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२६

नशामुक्त धुळे जिल्हा अभियान! सार्वजनिक गणेशोत्सव काळात धुळे पोलिसांकडून जनजागृती


 नशामुक्त धुळे जिल्हा अभियान! सार्वजनिक गणेशोत्सव काळात धुळे पोलिसांकडून जनजागृती

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘नशामुक्त धुळे’ संकल्पना राबविण्यात येत असून, अमली पदार्थ आणि व्यसनाधीनतेविरोधात धुळे पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे.

धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. विशाल आनंद यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळे आणि विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी ‘Drug Free Dhule District’, ‘निरोगी भविष्यासाठी नशामुक्त धुळे जिल्हा’ तसेच ‘व्यसनमुक्त धुळे-सुरक्षित धुळे’ अशा संदेशांचे बॅनर लावून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

भारत सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत अमली पदार्थ आणि व्यसनाधीनतेपासून मुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात बेकायदेशीर अमली पदार्थांविरोधात Zero Tolerance धोरण राबविण्यात येत आहे.

धुळे पोलिसांच्या आधुनिक चलच्चित्र वाहनाद्वारे देखील नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली जात आहे. विशेषतः तरुण पिढीला अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

व्यसनाचा परिणाम केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजावर होतो. त्यामुळे सशक्त आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी युवा पिढी व्यसनमुक्त असणे गरजेचे आहे, असा संदेश धुळे पोलिसांकडून देण्यात येत आहे.

धुळे जिल्हा पोलिसांनी नागरिकांना, विशेषतः पालक आणि शिक्षकांना, आपल्या सभोवतालच्या तरुणांकडे लक्ष देण्याचे आणि व्यसनमुक्तीच्या या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

जनसंघर्ष न्यूज, धुळे.

लेबल: ,

बनावट दारू बनवण्याचा डाव फसला! आझादनगर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १२५० लिटर स्पिरिट जप्त!

 

बनावट दारू बनवण्याचा डाव फसला ! आझादनगर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १२५० लिटर स्पिरिट जप्त!

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- बनावट दारू तयार करण्यासाठी तब्बल १२५० लिटर स्पिरिटची वाहतूक करणाऱ्या दोघांना आझादनगर पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या कारवाईत स्पिरिटसह दोन चारचाकी वाहने असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी आझादनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, धुळे शहरातील पांझरा नदीलगत वड भिलाटी रोडवरील एका पत्री शेडमध्ये बनावट दारू तयार करण्यासाठी स्पिरिटची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकत विनोद बन्सीलाल फुलपगारे, वय ४७ वर्षे, रा. भोई गल्ली, जुने धुळे आणि जितेंद्र सेवाराम टेकवाणी, वय ४७ वर्षे, रा. कुमारनगर, साक्री रोड, धुळे या दोघांना ताब्यात घेतले.

या कारवाईत ५ ड्रममध्ये १०७५ लिटर स्पिरिट, तसेच ५ कॅनमध्ये १७५ लिटर स्पिरिट, असा एकूण १२५० लिटर बनावट दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे स्पिरिट जप्त करण्यात आले.

यासोबतच मारुती सुझुकी वॅगनआर आणि महिंद्रा पिकअप अशी दोन वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ७५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७६/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई), १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विनोद पाटील आणि पोलीस अंमलदारांनी केली.

बनावट दारू निर्मितीला आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास आझादनगर पोलीस करीत आहेत.

लेबल: ,

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२६

रामदेव बाबा मंदिरात भक्तिमय वातावरण ; प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक

रामदेव बाबा मंदिरात भक्तिमय वातावरण;
प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक

जनसंघर्ष न्यूज 

 धुळे - शहरातील तार गल्ली परिसरातील प्राचीन श्री रामदेव बाबा मंदिरात भादवा महिन्याच्या दशमी व ग्यारसच्या पावन पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून मंदिरात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

आज, २१ सप्टेंबर रोजी पहाटे श्री रामदेव बाबा मंदिरात विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर होमहवन व आरती करण्यात आली. सकाळी १० वाजता श्री रामदेव बाबा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तार गल्ली येथून सुरू झालेली ही मिरवणूक गल्ली नंबर ४, महात्माजी दुग्धालय, मरी माता खुंट, ऊस गल्लीमार्गे आग्रा रोडने पुन्हा मंदिर परिसरात पोहोचली. यावेळी भाविकांच्या वतीने ठिकठिकाणी आरती करण्यात आली

मिरवणुकीत महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. भक्तिमय वातावरणात भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
            यावेळी रामदेव बाबा मंडळाचे अध्यक्ष कैलास मुरलीधर अग्रवाल, शांताराम कुलकर्णी, कैलास महाले, मनोज गवांदे, भूषण जाजू, निलेश जैन, प्रशांत वर्मा, चंद्रकांत जैन, पियुष अग्रवाल, विजय मगर, प्रफुल्ल शर्मा, कैलास चौधरी, भूषण दुसाने यांच्यासह असंख्य भाविक सहभागी झाले होते.

दुपारी श्री रामदेव बाबा मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच रात्री रामदेव बाबा भजनी मंडळाच्या वतीने भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले. भक्तिगीतांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला असून, दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

लेबल: ,

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२६

उपोषणाचा पाचवा दिवस; प्रकृती खालावली, तरी जिल्हा परिषद प्रशासन सुस्त! सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

 

उपोषणाचा पाचवा दिवस; प्रकृती खालावली, तरी जिल्हा परिषद प्रशासन सुस्त!

सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; अनुचित प्रकार घडल्यास अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा

जनसंघर्ष न्यूज 

धुळे : जिल्हा परिषद, धुळे येथील सुरक्षा रक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वैभव पाटील यांनी ११ सप्टेंबरपासून जेल रोड येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस असून, सलग उपोषणामुळे उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

सुरक्षा रक्षक कायदा लागू करावा, संबंधित सुरक्षा एजन्सीवर कारवाई करावी, थकीत वेतन व पीएफची रक्कम अदा करावी, आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, तसेच कामावरून कमी करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.

मात्र, उपोषणाचा पाचवा दिवस उजाडूनही प्रशासनाकडून अद्याप ठोस तोडगा काढण्यात आलेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत असतानाही प्रशासन नेमकी कोणाची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, उपोषणकर्त्याच्या प्रकृतीमध्ये आणखी बिघाड होऊन काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहील, असा गंभीर इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

उपोषणकर्त्याच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी व प्रशासनाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करून कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी करण्यात येईल, असेही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

११ सप्टेंबरपासून सुरू असलेले आमरण उपोषण आज पाचव्या दिवशी पोहोचले असून, प्रकृती खालावत असतानाही मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

“मागण्यांवर लेखी निर्णय होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका उपोषणकर्ते वैभव पाटील यांनी घेतली आहे.

आता जिल्हा परिषद प्रशासन या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लेबल: ,

धुळ्यात ‘पोस्टाचा महाराजा’ विराजमान; भारतीय डाकच्या अनोख्या उपक्रमातून गणरायाचे स्वागत

 

धुळ्यात ‘पोस्टाचा महाराजा’ विराजमान; भारतीय डाकच्या अनोख्या उपक्रमातून गणरायाचे स्वागत

जनसंघर्ष न्यूज 

धुळे : जिथे विश्वासाची बचत, सुरक्षिततेची हमी आणि सेवाभावाची परंपरा आहे, तिथे यंदा भारतीय डाकच्या वतीने भक्तिभावात ‘पोस्टाचा महाराजा’ विराजमान झाला आहे. श्री गणरायांच्या साक्षीने साकारलेल्या या सुंदर उपक्रमातून भारतीय डाक विभागाने गणेशोत्सवाला सामाजिक संदेशाची जोड दिली आहे.

भारतीय डाक विभागाकडून नागरिकांसाठी विविध बचत व सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येतात. बचत, विमा, पेन्शन, सुकन्या समृद्धी योजना यांसह विविध सेवांच्या माध्यमातून नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेला बळ देण्याचे काम भारतीय डाककडून केले जात आहे.

‘छोटी बचत, मोठी स्वप्ने आणि विश्वास सदैव भारतीय डाकचा’ हा संदेश देत ‘पोस्टाचा महाराजा’ हा उपक्रम नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात भारतीय डाकच्या सेवा आणि योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा अभिनव प्रयत्न ठरत आहे.

भारतीय डाक — सेवेतून विश्वास, विश्वासातून समृद्धी!

गणपती बाप्पा मोरया!

पोस्टाचा महाराजा विराजमान झाला!

लेबल: , ,

धुळ्यात गणपती बाप्पा मोरया च्या गजरात अन पारंपारिक वाद्यांच्या तालावर बाप्पाचे घरोघरी आगमन.


 

धुळ्यात गणपती बाप्पा मोरया च्या गजरात अन पारंपारिक वाद्यांच्या तालावर बाप्पाचे घरोघरी आगमन

जनसंघर्ष न्यूज 

धुळ्यात गणेश चतुर्थीच्या निमित्त बाजारात गणरायाच्या  मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचं दिसून आलं आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणत ढोल ताशा अन सांबुडच्या  तसेच पारंपारिक वाद्यांच्या तालावर लाडक्या गणरायाची घरोघरी स्थापना करण्यात आली आहे.यावेळी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचल्याच दिसून आलं. धुळ्यातल्या नाशिककर कुटुंबाच्या गणपतीला १४० वर्षाची तर किन्नर आखाड्याच्या गणरायाला १०० वर्षाचे परंपरा लाभली आहे.
शहरातल्या संतोषी माता चौक , फुलवाला चौक ,सिव्हिल हॉस्पिटल रोड यांसह दत्त मंदिर चौक यासह विविध भागात गणरायाच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.सकाळपासूनच अनेक नागरिकांनी गणरायाच्या मूर्ती घेऊन जाताना दिसून आले. घरोघरी गणरायाच्या मूर्ती स्थापनेसह मंडळाच्या मूर्ती देखील मोठ्या प्रमाणात मार्गस्थ झाल्या.गणरायाचं आगमन होत असल्याने लहान बालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
पारंपारिक कपडे परिधान करत नागरिकांसह महिलांनी देखील गणरायाचं अतिशय जल्लोषात स्वागत केलं आहे.गणेश चतुर्थी असल्याने नागरिकांची गर्दी लक्षात घेता पोलीस दलाच्या वतीने चौका चौकात चोक असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.ढोल ताशांचा गजर, डीजेचे धून अन पारंपारिक वेशभूषेत लाडक्या बाप्पाच करण्यात आलेले स्वागत धुळ्यातील आगमनाचं वैशिष्ट ठरलं आहे.यावेळी अनेक गणेश भक्तांनी भरपूर पाऊस पडू दे, शेतकऱ्यांसह नागरिकांना निरोगी आरोग्य दे , सुख समाधान दे अशा प्रकारचं मागणं आपल्या लाडक्या गणरायाकडे केलं आहे.बऱ्याच वर्षानंतर यंदा लाडक्या बाप्पाचा बारा दिवसाचा मुक्काम राहणार आहे.त्यामुळे विशेषता लहान बालकांमध्ये आनंद निर्माण दिसून आला आहे.वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे.

लेबल: ,

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२६

२४ वर्षांची परंपरा कायम! भगवा चौक गणेश मंडळाच्या गणरायाचे जल्लोषात स्वागत

 


२४ वर्षांची परंपरा कायम! भगवा चौक गणेश मंडळाच्या गणरायाचे जल्लोषात स्वागत

ढोल-ताशांचा गजर | १२ पावलीचा ठेका | फटाक्यांची आतषबाजी

जनसंघर्ष न्यूज 

    धुळे : शहरातील गणेशोत्सवाची परंपरा आणि उत्साहाची झलक दाखविणाऱ्या भगवा चौक गणेश मंडळाच्या गणरायाचे यंदा मोठ्या जल्लोषात वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, गणेशभक्तांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या १२ पावली नृत्यामुळे भगवा चौक परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला.

     भगवा चौक गणेश मंडळाच्या गणरायाच्या आगमनानिमित्त महाराणा प्रताप पुतळा येथून भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या तालावर आणि गणरायाच्या जयघोषात मिरवणूक मार्गस्थ झाली. कार्यकर्त्यांनी पारंपरिक १२ पावली नृत्यावर ठेका धरत गणरायाच्या आगमनाचा आनंद साजरा केला.

     मिरवणूक भगवा चौक येथे पोहोचल्यानंतर गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गणरायाच्या दर्शनासाठी आणि स्वागतासाठी परिसरातील नागरिक व गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

२४ वर्षांची परंपरा

    भगवा चौक गणेश मंडळाचे यंदाचे २४ वे वर्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणरायाचे भव्य स्वागत, विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम तसेच समाजप्रबोधनपर देखावे हे मंडळाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते.

    दरवर्षी केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक प्रश्नांकडे नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे भगवा चौक गणेश मंडळाच्या देखाव्यांकडे शहरवासीयांचे विशेष लक्ष असते.

यंदाही ज्वलंत विषयावर समाजप्रबोधनपर देखावा

     मंडळाची समाजप्रबोधनपर देखावा सादर करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. यावर्षी एका ज्वलंत आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयावर देखावा सादर करण्यात येणार आहे. या माध्यमातून समाजातील वास्तव परिस्थिती नागरिकांसमोर मांडत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

      गणरायाच्या आगमनाने भगवा चौक परिसरात गणेशोत्सवाची उत्सवी सुरुवात झाली असून, आगामी दिवसांत मंडळाच्या विविध उपक्रमांना सुरुवात होणार आहे. भक्ती, संस्कृती आणि समाजप्रबोधनाचा संगम साधत यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प आयोजक एडवोकेट पंकज गोरे यांनी केला आहे.

    यावेळी एडवोकेट गुलाब गोरे, माजी नगरसेवक नंदकुमार गोरे, प्रवीण मुर्तडकर, विनोद रनमळे, आप्पा लहामगे, विजय गोरे,मनोज गवळी, मंगेश पिंगळे, बिल्लू शर्मा, बाळू पेढवाल, राजेंद्र ठक्कर, बाळू पाटील, गुलाब येलमामे, योगेश गोरे,भटू नवाळे, देविदास पाटील, पंकज भारस्कर, सागर साळवे, जयवंत गोरे,धनंजय दीक्षित, ज्ञानेश्वर देवरे, श्याम गुप्ता, निलेश चौधरी, सौरभ जवराल, गोकुळ येलमामे, स्वप्नील सोनवणे,सिद्धेश गोरे, साई गोरे, अंकुश बोबडे, मयूर कुळकर्णी, ऋषिकेश गोरे, सिद्धार्थ गोरे, रोहित गिरासे, हर्षल ढोले, अजय वराडे, रोहित लहामगे, पंकज बागुल, अमोल गोरे, कुणाल मराठे,विनोद प्रजापत, विक्की गर्ग, यांच्या सह भागातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते

लेबल: ,

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श! मुन्ना पठाण यांच्या हस्ते शिवसेना कार्यालयात गणरायाची स्थापना

 


हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श! मुन्ना पठाण यांच्या हस्ते शिवसेना कार्यालयात गणरायाची स्थापना

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गणरायाचे आगमन होत असताना आज गणेश चतुर्थीचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धुळे शहरातील मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना उबाठाचे कट्टर शिवसैनिक शिवसेना शहर सहसंघटक मुन्ना पठाण यांच्या हस्ते गणरायाची स्थापना करून सामाजिक एकतेचा एक आगळा वेगळा संदेश देण्यात आला.

दरवर्षी धुळे शहरातील प्रबोधनकार ठाकरे संकुल येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात विविध मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून गणरायाची स्थापना केली जाते. यंदाच्या वर्षी कार्यालयातील या गणरायाच्या स्थापनेचा मान मुस्लिम पदाधिकारी मुन्ना पठाण यांना देण्यात आला मुन्ना पठान हे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना पक्षात सक्रिय असून त्यांनी याआधी शिवसेना उप महानगर प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळलेली असून, त्यांचा सातत्याने हिंदू समाजात राबता राहिलेला असून हिंदू सणांच्या प्रत्येक कार्यक्रमात ते आवर्जून सहभागी होत असतात. त्यांनी याआधी भाग्या मारुती विजय व्यायाम शाळा गणेश मंडळात देखील अनेक वर्ष आपला सक्रिय सहभाग नोंदवलेला असून मुन्ना पठाण यांच्याकडे सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. आज शिवसेना कार्यालयात त्यांच्या हस्ते स्थापना झाल्यानंतर विधिवत आरती व प्रसादाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी , निंबा मराठे महानगर प्रमुख धीरज पाटील शहर संघटक आण्णा फुलपगारे,आंनंद जावडेकर, सुभाष मराठे उपमहानगर प्रमुख कपिल लिंगायत, महादू गवळी, निलेश कांजरेकर, योगेश पाटील, संजय पाटील,राजु पाटील आदी उपस्थित होते.

लेबल: ,

भारतीय संविधान सेनेच्या अतिक्रमण विरोधात आंदोलनाचा आठवा दिवस ; आंदोलकांची तब्येत खालावली , तरी प्रशासनाचे दुर्लक्ष !

 

भारतीय संविधान सेनेच्या अतिक्रमण विरोधात आंदोलनाचा आठवा दिवस ; आंदोलकांची तब्येत खालावली , तरी प्रशासनाचे दुर्लक्ष !

जनसंघर्ष न्यूज 

धुळे : शहरातील विविध नागरी प्रश्न आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यांवर भारतीय संविधान सेनेच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. आंदोलनाला आठ दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दरम्यान, उपोषणामुळे काही आंदोलकांची तब्येत खालावल्याचे आंदोलनस्थळी दिसून आले आहे.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मनपा रस्त्यावर असलेल्या ‘बाबासाहेब कोतेवाल ट्रस्ट’च्या बांधकामाबाबत कारवाई, जेल रोडवरील व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या तात्पुरत्या जागेबाबत लेखी खुलासा, आंदोलनस्थळावरील नियमबाह्य पक्के शेड व गाळे हटविणे, जुन्या मनपा मागील गेटमधून महिलांना मनपा रुग्णालयात जाण्यासाठी मार्ग खुला करणे तसेच धुळे शहरातून जाणारा मुंबई-आग्रा महामार्ग अतिक्रमणमुक्त करणे, या मागण्यांचा समावेश आहे.

आंदोलनाचा आठवा दिवस उजाडला असतानाही मागण्यांवर अपेक्षित कार्यवाही न झाल्याने आंदोलकांमध्ये नाराजी वाढत आहे. “आंदोलकांची प्रकृती खालावत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष का?” असा सवाल आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

आता प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि उपोषणाची पुढील दिशा काय असेल, याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे.

लेबल: , ,

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२६

ग. स. बँकेच्या चेअरमनपदी शशांक रंधे तर व्हा.चेअरमनपदी बापूराव पाटील.


ग. स. बँकेच्या चेअरमनपदी शशांक रंधे तर व्हा.चेअरमनपदी बापूराव पाटील

जनसंघर्ष न्यूज 


धुळे प्रतिनिधी 

धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक अर्थात ग.स. बँकेच्या चेअरमनपदी शशांक रंधे यांची निवड झाली आहे. तर व्हा. चेअरमनपदावर बापूराव पाटील यांची वर्णी लागली. ही निवड घोषित होताच गुलाल उधळण्यात येवून जोरदार आतषबाजी करण्यात आली. ग. स. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत गटनेते निशांत रंधे यांच्या नेतृत्वात लोकमान्य पॅनेलने दणदणीत विजय हासील केला होता. सर्व संचालकांनी एकमुखाने शशांक रंधे यांना चेअरमनपदासाठी तर व्हा. चेअरमनपदासाठी बापूराव पाटील यांना पसंती दिली आहे. निवडीप्रसंगी माजी चेअरमन सी.एन. देसले, पतसंस्थेचे गटनेते विनोद खैरनार, संदीप पवार, चुनीलाल अहिरे, बबन नगराळे, संजय पवार, भैया शिंदे, निंबा माळी, चंद्रकांत सत्यसा, अशोक पवार यांच्यासह संचालक प्रशांत बोरसे, प्रविण भदाणे, सोनाली भामरे, भूपेंद्र बाविस्कर, दिपक अहिरे, बिपिनचंद्र सोनवणे, विजयकुमार माळी, अमोल शिंदे, मयूर पवार, प्रकाश बच्छाव, देवेंद्र बोरसे, दिपक निकम, आनंदराव करनकाळ, वैभव सोनवणे, संदीप येळवंडे, लक्ष्मण देसले, शंकर वसावे, कविता मोरे, योगेश धात्रक आदी उपस्थित होते. या निवडीसाठी निवड निर्णय अधिकारी म्हणून शिरपुरचे सहाय्यक निबंधक राजेंद्र विरकर यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना अमोल यंडाईत आणि नागेश पुकळे यांनी सहकार्य केले.

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६

निमखेडी येथे बैल पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांमध्ये उत्साह; बैलांची थाटामाटात पूजा


 

निमखेडी येथे बैल पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांमध्ये उत्साह; बैलांची थाटामाटात पूजा


जनसंघर्ष न्यूज 

धुळे - तालुक्यातील निमखेडी येथे बैल पोळा सनानिमित्त सजविलेल्या सर्जा राजांची घरोघरी विधिवत पूजा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी बैलांना औक्षण करून त्यांची आरती केली. पुरणपोळी, खीर, गोडधोड पदार्थ तसेच विविध पारंपरिक नैवेद्य दाखवून बैलांना खाऊ घालण्यात आला. अनेक ठिकाणी घरासमोर रांगोळी काढून बैलांचे स्वागत करण्यात आले.

       शेतीच्या कामात वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून मेहनत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात निमखेडी येथे साजरा करण्यात आला.

       पोळ्याच्या पार्श्वभूमीवर गावागावांत शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना पहाटेपासूनच सजविण्यास सुरुवात केली. बैलांना नदी, विहीर किंवा तलावावर नेऊन पारंपरिक पद्धतीने आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर त्यांच्या शिंगांना रंग देण्यात आला. अंगावर विविध रंगांची नक्षी काढून झुली, गोंडे, घुंगरू, माळा तसेच आकर्षक सजावटीच्या वस्तूंनी बैलांना सजविण्यात आले.

       यावेळी शेतकरी रतिभान पाटील, कैलास पाटील, प्रदीप भदाणे दिलीप भदाणे, भाईदास पाटील, बाबुलाल भदाणे, प्रताप पाटील, सुभाष पाटील, जितेंद्र पाटील, रोहिदास पाटील, प्रेमराज पाटील, महेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रवीण पाटील, रविंद्र पाटील, अमोल पाटील, मुन्ना पाटील, आकाश पाटील आदि उपस्थित होते. 



*पोळा मिरवणुकीने वाढविला उत्साह

      गावातील महादेव मंदिर चौक आणि आनंदा माता मंदिर परिसरात सजविलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथके आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात बैलांची मिरवणूक पार पडली. यावेळी महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

*शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी

     बैल पोळा सण हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा मानला जातो. परंतु वरून राजाने तडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. तरी देखील शेतकऱ्यांनी आनंदात उत्साहात आपल्या सर्जा राजाची घरोघरी पूजा केली. यावेळी शेतकऱ्यांनी पावसाचे आगमन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. तसेच राज्य सरकारने देखील शेतकरी राजाला मदत करावे असे देखील मत व्यक्त केले.

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२६

बालविवाह निर्मूलनासाठी धुळे जिल्ह्याची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी


 

  बालविवाह निर्मूलनासाठी धुळे जिल्ह्याची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी 

बालविवाहमुक्त भारत अभियानाला जागतिक मान्यता ; २७ नोव्हेंबर ‘बाल, लवकर आणि सक्तीच्या विवाह निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून घोषित

जनसंघर्ष न्यूज 

धुळे : बालविवाह निर्मूलनासाठी भारतासह जगभर सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, संयुक्त राष्ट्र महासभेने २७ नोव्हेंबर हा ‘बाल, लवकर आणि सक्तीच्या विवाह निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे धुळे जिल्ह्यातील सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्था आणि बालविवाह निर्मूलनासाठी कार्यरत संस्थांनी स्वागत केले आहे.

धुळे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून ‘बालविवाहमुक्त भारत’ अभियान सातत्याने राबविण्यात येत आहे. Just Rights for Children यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या या अभियानाचे नेतृत्व सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. मीना भोसले करीत आहेत.

शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांमधून जनजागृती

बालविवाहाविरोधात शाळा, महाविद्यालये, मंदिरे, मशीद, चर्च, गुरुद्वारा तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थी, पालक, शिक्षक, महिला, युवक आणि नागरिकांशी संवाद साधून बालविवाहाचे दुष्परिणाम, बालकांचे शिक्षण, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि नागरिकांची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली.

“मुलीचे शिक्षण थांबवू नका, तिचे बालपण हिरावून घेऊ नका आणि योग्य वयापूर्वी तिचा विवाह करू नका,” हा संदेश विविध माध्यमांतून समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.

या जनजागृतीमुळे बालविवाहाच्या प्रश्नावर समाजात चर्चा वाढली असून, बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे आणि आवश्यकतेनुसार प्रशासनाला माहिती द्यावी, यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.

धुळे जिल्ह्यातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग

या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे धुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांचा मिळालेला एकत्रित सहभाग. लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शासकीय अधिकारी-कर्मचारी, न्यायव्यवस्था, महिला व बाल विकास विभाग, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक प्रतिनिधी आणि नागरिकांनी अभियानात सक्रिय सहभाग घेतला.

अभियानाला धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ. शोभाताई बच्चाव, धुळे शहराचे आमदार श्री. अनुप अग्रवाल, धुळे शहराच्या महापौर सौ. मायादेवी परदेशी तसेच विविध मान्यवरांचे सहकार्य मिळाल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

जागतिक चळवळीशी धुळ्याची नाळ

‘बालविवाहमुक्त भारत’ अभियान आता ‘Child Marriage Free World’ या व्यापक जागतिक चळवळीशी जोडले गेले आहे. बालविवाहामुळे मुलांचे शिक्षण थांबते, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि भविष्यातील संधी मर्यादित होतात. त्यामुळे बालविवाह रोखणे ही केवळ एका कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचा संदेश अभियानातून देण्यात येत आहे.

संस्थेच्या निवेदनानुसार, Just Rights for Children चे संस्थापक श्री. भुवन रिबू यांनी बालविवाह निर्मूलनाच्या जागतिक चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मार्च २०२६ मध्ये झालेल्या Commission on the Status of Women (CSW) मध्ये बालविवाह निर्मूलनासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दिवस घोषित करण्याची मागणी जागतिक स्तरावर मांडण्यात आली होती.

“प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपण आणि शिक्षणाचा अधिकार”

संयुक्त राष्ट्रांच्या निर्णयामुळे बालविवाहविरोधी लढ्याला आणखी बळ मिळाले असून, प्रत्येक मुलाला सुरक्षित बालपण, प्रत्येक मुलीला शिक्षण आणि प्रत्येक कुटुंबाला बालविवाहाच्या दुष्परिणामांपासून मुक्त समाज मिळावा, यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेने म्हटले आहे.

बालविवाह थांबविणे, बालपण वाचविणे, मुलींचे शिक्षण सुनिश्चित करणे आणि बालविवाहमुक्त धुळे, महाराष्ट्र व भारत घडविणे, हा निर्धार व्यक्त करत संस्थेने अभियानात सहभागी सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन, सामाजिक संस्था, शिक्षक, पत्रकार आणि नागरिकांचे आभार मानले आहेत.

लेबल: , , ,

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

अंगणवाडी क्रमांक १२ मागील भागात संरक्षण भिंत व वॉल कंपाऊंडची मागणी ; ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन


अंगणवाडी क्रमांक १२ मागील भागात संरक्षण भिंत व वॉल कंपाऊंडची मागणी ; ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

जनसंघर्ष न्यूज 

शहादा, प्रतिनिधी :

शहादा तालुक्यातील मौजे प्रकाशा येथील श्यामनगर भागातील अंगणवाडी केंद्र क्रमांक १२ च्या मागील बाजूस संरक्षण भिंत तसेच वॉल कंपाऊंड तातडीने उभारण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत श्यामनगर भागातील ग्रामस्थांनी शहादा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, अंगणवाडीच्या मागील भागात सध्या संरक्षण भिंत नसल्याने परिसरात विषारी सर्प तसेच इतर सरपटणारे प्राणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. अंगणवाडीच्या जवळच जिल्हा परिषद मराठी शाळा असल्याने तेथे येणाऱ्या लहान बालकांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत, अंगणवाडी परिसरात संरक्षण भिंत व वॉल कंपाऊंडचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

या निवेदनावर गोपालभाऊ बिल, महेश गुरव, दीपक ठाकरे, चेतन ठाकरे, अविनाश शिरसाट आणि पंकज कोळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

“लहान बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून प्रशासनाने कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने संरक्षण भिंत उभारावी,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लेबल: ,

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२६

धुळ्यात महिला दहीहंडी उत्सवात फुटणार ‘अवैध धंद्यांची दहीहंडी’; एडवोकेट पंकज गोरे यांच्या पुढाकाराने अनोखा उपक्रम

 



धुळ्यात महिला दहीहंडी उत्सवात फुटणार ‘अवैध धंद्यांची दहीहंडी ’; एडवोकेट पंकज गोरे यांच्या पुढाकाराने अनोखा उपक्रम

५ सप्टेंबर रोजी भगवा चौकात महिला दहीहंडी उत्सवाचे आयोजन ; विद्यार्थी, महिला आणि धुळेकर नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

जनसंघर्ष न्यूज 

धुळे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एडवोकेट पंकज गोरे यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही महिला दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भगवा चौक येथे हा उत्सव उत्साहात पार पडणार आहे. मात्र यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे पारंपरिक दहीहंडीबरोबरच ‘अवैध धंद्यांची दहीहंडी’ फोडून सामाजिक संदेश देण्यात येणार आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यात वाढत असलेल्या कथित अवैध धंद्यांना आळा घालावा, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि तरुण पिढीला व्यसन व गुन्हेगारीपासून दूर ठेवावे, या मागणीसाठी एडवोकेट पंकज गोरे यांच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, आता दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातूनही अवैध धंद्यांविरोधात जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भगवा चौकातील महिला दहीहंडी उत्सवाला गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवात पाहायला मिळतो. यंदा या परंपरेला सामाजिक विषयाची जोड देत अवैध धंद्यांविरोधातील संदेश दहीहंडीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव केवळ मनोरंजनाचा न राहता सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधणारा ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

एडवोकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात धुळे शहरातील अवैध धंदे बंद करण्यासह प्रशासनाने या प्रकारांकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी करण्यात येत आहे. विशेषतः तरुणाईला व्यसनाधीनतेपासून वाचविणे, शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करणे आणि अवैध व्यवसायांना आळा घालणे, या मुद्द्यांवर आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर ‘अवैध धंद्यांची दहीहंडी फोडूया’ या संकल्पनेतून यंदाचा दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. दहीहंडी फोडण्याच्या माध्यमातून प्रशासन आणि समाजाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, युवक तसेच धुळे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एडवोकेट पंकज गोरे व भगवा चौक गणेश  सार्वजनिक गणेश अध्यक्ष पंकज भारस्कर यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे ५ सप्टेंबर रोजी भगवा चौकात होणाऱ्या या महिला दहीहंडी उत्सवाकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, उत्सवाच्या माध्यमातून दिला जाणारा सामाजिक संदेश आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन याकडे कोणत्या पद्धतीने पाहते, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. पारंपरिक उत्सवाला सामाजिक आंदोलनाची जोड देत यंदा धुळ्यातील महिला दहीहंडी उत्सव वेगळ्या कारणासाठी चर्चेत येणार आहे.

लेबल: ,

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी; धुळ्यात लोक जनशक्ती पार्टीचे जोरदार निदर्शने.


केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी; धुळ्यात लोक जनशक्ती पार्टीचे जोरदार निदर्शने.

जनसंघर्ष न्युज 

धुळे : लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे निवेदन सादर केले. चिराग पासवान हे आरक्षण तसेच भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ ठाम भूमिका मांडत असल्यामुळे त्यांना धमकी देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

लोकशाही व्यवस्थेत केंद्रीय मंत्र्यांना अशाप्रकारे जीवे मारण्याची धमकी देणे ही गंभीर बाब असून, या प्रकरणाची तातडीने व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली. धमकी देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच चिराग पासवान यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांना तातडीने अतिरिक्त सुरक्षा पुरवावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.या आंदोलनात आणि निवेदन प्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप आप्पा साळवे ,महिला आघाडी शोभाताई चव्हाण,कुंदन खरात ,मधुकर चव्हाण ,सागर चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेबल: ,

बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोर्चा धुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन.

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोर्चा धुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन.


जनसंघर्ष न्युज 

धुळे - महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, जिल्हा शाखा धुळे यांच्या वतीने मंगळवारी ग्रामपंचायत अधिकार्यांच्या सुरक्षिततेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगार कल्याण भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यासाठी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे १७ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभा सुरू असताना कर्तव्य बजावत असलेले ग्रामपंचायत अधिकारी स्व. पी. एन. पाटील यांचा मानसिक व शारीरिक त्रासामुळे मृत्यू झाल्याचे आंदोलकांचे म्हणणे असून या घटनेच्या निषेधार्थ हा मूक मोर्चा काढण्यात आला अशी माहीती देण्यात आली. या घटनेमुळे राज्यभरातील ग्रामपंचायत अधिकार्यामध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी युनियनच्या वतीने शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या. शिवरे प्रकरणातील दोर्षीवर खुनाचा गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी व खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच ग्रामसभांची संख्या कमी करून वर्षातून केवळ एकच आर्थिक नियोजन व आढावा ग्रामसभा घेण्याची कायदेशीर तरतूद करावी, ग्रामसभांमध्ये त्रयस्थ व्यक्तींमार्फत होणार्या अनधिकृत व्हिडिओ चित्रीकरणावर आणि सोशल मीडियावरील बदनामीवर कायदेशीर बंदी घालावी, संवेदनशील व वादग्रस्त ग्रामसभांसाठी प्रशासनाकडून सक्तीने व विनामूल्य पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्याही करण्यात आल्या. याशिवाय कृषी, आरोग्य, समाजकल्याण आदी विभागांच्या योजनांबाचतच्या विशेष ग्रामसभांचे आयोजन व प्रशासकीय जबाबदारी संबंधित विभागांकडेच सोपवावी, वैयक्तिक लाभाच्या योजनांतील लाभार्थी निवड ग्रामसभेऐवजी तालुका किंवा पंचायत समिती स्तरावर पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. धुळे तालुक्यातील उडाणे, शिरपूर तालुक्यातील झेंडेअंजन आणि नवे लोंढरे येथील ग्रामपंचायत अधिकार्यांवरील कथित गैरवर्तनाच्या प्रकरणांतील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही युनियनने केली. मोर्चात जिल्हाभरातील ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने ग्रामपंचायत अधिकार्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरण जाहीर करून मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या मोर्चात ग्रामपंचायत अधिकारी युनियन जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार शिंदे, उपाध्यक्ष जितेंद्र गवळी, ज्ञानेश्वर तिरमले, गोकुळ ठाकरे, सुनिल देसले, श्रीमती सारिका गिते, दिलीप पाकळे, चेतन पाटील, चत्रू पवार, शितलकुमार चौरे आदी सहभागी झाले.

लेबल:

‘अवैध धंद्यांची’ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत ॲड. पंकज गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाचा निषेध


 धुळ्यात अवैध धंद्यांविरोधातील आंदोलनाचा सातवा दिवस; ‘अवैध धंद्यांची’ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत प्रशासनाचा निषेध

पोलीस अधीक्षक कार्यालय गेट वर विसावा देऊन अंत्ययात्रा पुन्हा आंदोलन स्थळी आणून अग्निडाग देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

प्रशासनाच्या भूमिकेवर आंदोलकांचा संतप्त सवाल; “अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास विलंब का? प्रशासनावर नेमका कुणाचा दबाव?”

जनसंघर्ष न्यूज 

धुळे : धुळे शहर व परिसरातील कथित अवैध धंद्यांना आळा घालून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी ॲड. पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सातवा दिवसही आक्रमक आंदोलनाने गाजला. सलग सात दिवस आंदोलन सुरू असूनही प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांशी चर्चेसाठी ठोस पुढाकार घेतला जात नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आंदोलनाच्या सातव्या दिवशी प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी ‘अवैध धंद्यांची’ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. अंतयात्रा आंदोलन स्थळावरून पोलीस अधीक्षक कार्यालयावर जाऊन गेटवर विसावा दिला तिथून वापस आंदोलन स्थळी येऊन अंतयात्रेस अग्निडाग देऊन प्रशासनाचा जाहीर निषेध केला. प्रतीकात्मक अंतयात्रेच्या माध्यमातून शहरातील कथित अवैध धंद्यांविरोधात तसेच त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याच्या आरोपाविरोधात आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रतिकात्मक अंत्ययात्रेदरम्यान आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली.ला

“प्रशासनावर नेमका कुणाचा दबाव?”

यावेळी ॲड. पंकज गोरे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. अवैध धंद्यांचा प्रश्न गंभीर असताना प्रशासन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यास पुढे का येत नाही, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केले जात आहे आणि प्रशासनावर नेमका कुणाचा दबाव आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

सामान्य नागरिक किंवा छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करताना प्रशासनाची यंत्रणा तत्परतेने कार्यरत होते; मग शहरातील कथित अवैध धंद्यांविरोधात कारवाई करताना अशीच तत्परता का दाखवली जात नाही, असा प्रश्नही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

धुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षेचा आणि सामाजिक वातावरणाचा प्रश्न

धुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब आमच्या घरातील आहे त्यांच्या सुरक्षेसाठी आमचा हा लढा असून अवैध धंद्यांचा मुद्दा हा केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरता मर्यादित नसून त्याचा परिणाम शहरातील सामाजिक वातावरण, तरुणाई आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.

शहरात अवैध धंद्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण किंवा पाठबळ मिळू नये, तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित यंत्रणांनी त्यांची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

प्रशासनाने पारदर्शक भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणावर पारदर्शक भूमिका स्पष्ट करावी, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी आणि कथित अवैध धंद्यांविरोधात सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी मागणी केली.

आंदोलनाचा सातवा दिवस सुरू असतानाही प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा ॲड. पंकज गोरे यांनी दिला आहे. प्रशासनाने तातडीने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

आंदोलनाची पुढील दिशा काय?

सातव्या दिवशी काढण्यात आलेल्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेमुळे आंदोलनाला आणखी आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी चर्चेसाठी पाठवणार का, तसेच कथित अवैध धंद्यांविरोधात प्रत्यक्षात कोणती कारवाई केली जाणार, याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून ठोस आणि सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

या आंदोलनात पंकज भारस्कर, संदीप चौधरी, ज्योती ताई सोनवणे, मयूरी सोनवणे,सागर साळवे, , सागर निकम, सुरज भावसार, मनोज गवळी, अजय चौधरी, बंटी गोरे, सोनू मुर्तडकर,स्वप्नील सोनवणे, विपुल भारस्कर, गोकुळ येलमामे, दर्शन खंबायत, सौरभ जवराळ, मुकेश जाधव, ज्ञानेश्वर देवरे, प्रवीण पाटील, सिद्धार्थ गोरे, अक्षय लाड यांच्यासह अनेक आंदोलक सहभागी झाले होते.

लेबल: , ,